Join us  

Sholayतील या डायलॉगसाठी 'सांभा'नं तब्बल २७ वेळा मुंबई-बंगळुरु अशा मारल्या होत्या फेऱ्या, वाचा हा इंटरेस्टिंग किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 4:13 PM

जवळपास तीन तासाच्या शोलेमध्ये सांभा फक्त एकच डायलॉग बोलला होता आणि या एका डायलॉगने ते जगभरात लोकप्रिय झाले होते.

सत्तरच्या दशकातील ब्लॉकबस्टर सिनेमा शोलेतील सांभाच्या भूमिकेतून अभिनेते मॅक मोहन (Mac Mohan) यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप उमटविली होती. या भूमिकेनंतर ते सांभाच्या नावाने ओळखू लागले होते. मॅक यांनी चित्रपटात कधीच मुख्य भूमिका केली नाही पण ते बॉलिवूडमधील बऱ्याच चित्रपटात झळकले. त्यांनी बॉलिवूडमधील प्रत्येक मोठ्या स्टारसोबत स्क्रीन शेअर केली. जवळपास तीन तासाच्या शोलेमध्ये सांभा फक्त एकच डायलॉग बोलला होता आणि हा डायलॉग होता पूरे पचास हजार. या एका डायलॉगने ते जगभरात लोकप्रिय झाले होते.

पूरे पचास हजार या डायलॉगचा किस्सा समजल्यावर हैराण व्हाल कारण या एका डायलॉगच्या शूटिंगसाठी मॅक मोहन यांना मुंबई ते बंगळुरू असा २७ वेळा प्रवास करावा लागला होता. सुरूवातीला शोलेमध्ये त्यांची भूमिका मोठी होती. मात्र चित्रपटाचे एडिटिंग झाल्यानंतर त्यांचा फक्त एकच डायलॉग होता. मॅक मोहन शोलेचे एडिटिंग झाल्यानंतर चित्रपट पाहून खूप हताश झाले होते. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, जेव्हा मी सिनेमा पाहिला तेव्हा मी रडू लागलो होतो. मी थेट दिग्दर्शक रमेश सिप्पींकडे गेलो आणि त्यांना म्हणालो की माझा एवढा छोटा रोल का ठेवला? तुम्हाला हवे होते तर काढून टाकायचे. तेव्हा ते म्हणाले की, जर चित्रपट हिट झाला तर जग तुला सांभाच्या नावाने ओळखेल आणि तसेच घडले.

१९६४ साली मॅक मोहन यांनी हकीकतमधून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. ४६ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी जवळपास १७५ चित्रपटात काम केले होते. अतिथी तुम कब जाओगेचे शूटिंग करत होते तेव्हा त्यांची तब्येत बिघडली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते जेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितले की त्यांच्या फुफ्फुसात ट्युमर आहे. त्यानंतर त्यांच्यावर बराच काळ उपचार झाले पण १० मे, २०१० रोजी त्यांनी जगाला अलविदा केले.

टॅग्स :मॅक मोहन