दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्या यांसारख्या संवेदनशील विषयांवर यापूर्वी अनेक चित्रपट येऊन गेले असले, तरी ‘रंगा पतंगा’ हा चित्रपट वेगळ्या अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. कारण या चित्रपटात विदर्भातील एका मुस्लीम शेतकऱ्याची गोष्ट उलगडण्यात आली आहे. शेतकऱ्याच्या व्यथेपेक्षा मूक जनावर आणि शेतकरी यांच्यातील जिव्हाळ्याच्या नात्यावर हा चित्रपट भाष्य करतो. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘संत तुकाराम’ सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या पुरस्कारांवर चित्रपटाने नाव कोरले आहे. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीची साद घालणारे मकरंद अनासपुरे जुम्मन या मुस्लीम व्यक्तिरेखेमधून प्रेक्षकांसमोर येत आहेत. ‘रंगा पतंगा’ या चित्रपटाच्या टीमने ‘लोकमत’ कार्यालयाला भेट देऊन चित्रपटाच्या प्रवासाबद्दल संवाद साधला. फर अॅनिमेशनचा वापर मराठी चित्रपटामध्ये पहिल्यांदाच ‘रंगा पतंगा’ ही एका शोधाची कथा आहे. बैल आणि जुम्मन यांच्यातील भावबंध, त्यातील उत्कटता दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटामध्ये जुम्मन नावाची व्यक्तिरेखा साकारणारा मकरंद अनासपुरे यांच्या स्वप्नातील त्यांच्या दोन बैलांसमवेतचा एक प्रसंग प्रेक्षकांना खराखुरा वाटण्यासाठी फर अॅनिमेशनचा वापर करण्यात आला आहे. याआधी या अॅनिमेशनचा वापर हॉलीवूड व बॉलीवूडमधल्या बहुचर्चित अॅनिमेटेड चित्रपटांसाठी करण्यात आला होता. मराठी चित्रपटामध्ये प्रथमच या फर अॅनिमेशनचा वापर करण्यात आला असल्यामुळे मराठी चित्रपटांचा दर्जा दिवसेंदिवस वाढत असून, नवीन गोष्टी प्रेक्षकांना पाहण्यास मिळत आहेत. शेतकऱ्यांचे आपल्या मुक्या प्राण्यांवर जिवापाड प्रेम असते. त्यांचे सर्वस्व हे त्यांच्यावर अवलंबून असते. अशा एका मुस्लीम शेतकऱ्याचे त्याच्या बैलाच्या जोडीवर असलेल्या प्रेमाची, त्यांच्यामधील ऋणानुबंधाची ही कथा आहे. शेतकरी हिंदू असो वा मुस्लीम, प्रत्येक शेतकऱ्याच्या व्यथा या सारख्याच असतात. कथेमध्ये मुस्लीम शेतकऱ्याची मागणी होती म्हणून मुस्लीम शेतकऱ्याची भूमिका मी साकारू शकलो. याच धाटणीच्या ‘गोष्ट डोंगराएवढी’मध्ये कृषिमंत्र्यांच्या अपहरणातून एक राग व्यक्त करण्यात आला होता. पण ‘रंगा पतंगा’मध्ये वास्तवाची दाहकता मांडण्यात आली आहे. सध्याची परिस्थिती पाहिली, तर आपण आत्ममग्न जीवन जगत आहोत. रस्त्यावर एखाद्या बेडकाच्या अंगावर पाय पडला, तर तोही जिवाच्या भीतीने उडी मारतो. मग ३५ वर्षांच्या विधवा महिला आणि त्यांच्या हातात असलेले दोन महिन्यांचे मूल पाहून मन हेलावते. आत्महत्या करायला मन धजावत नाही. पण इथे मला जगायचेच नाही, ही मानसिकता भयानक वाटते. गेल्या काही वर्षांमध्ये पर्जन्यमान बदलले आहे. कोरडवाहू शेती, दुबार पेरणींना फटका बसत आहे. हे चित्र पाहता शासनावर विसंबून राहण्यापेक्षा स्वत: पुढे येऊन मदतीचा हात पुढे करण्याची गरज वाटली. नानालाही त्याचे गांभीर्य कळले आणि नाम फाउंडेशनची मुहूर्तमेढ रोवली गेली. - मकरंद अनासपुरे, अभिनेताचांगला आशय, उत्तम कलाकार, उत्कृष्ट संगीत या गोष्टी चित्रपटाला पूरक असतात. परंतु मार्केटिंग आणि बजेट या गोष्टींच्या कमतरतेमुळे चित्रपट तळागाळातील लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकत नाही. चित्रपट चालण्यासाठी चित्रपटाचे प्रमोशन हा महत्त्वाचा घटक असतो. सोशल मीडिया हे प्रमोशनचे उत्तम माध्यम बनले आहे. - अमोल गोळे, निर्माताया चित्रपटाचा विषय खूपच चांगला आहे. त्यामुळे करिअरसाठी फायदेशीर चित्रपट ठरेल, असे वाटले. यापूर्वीही अनेक आशयघन चित्रपट केले आहेत. मात्र, ते चित्रपट प्रेक्षकांपर्यंत फार कमी प्रमाणात पोहोचू शकले. मुळात विनोदी आणि गंभीर अभिनेता अशी ओळख मला मान्य नाही. तो कलावंत आणि अभिनेता आहे, असे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल. - संदीप पाठक, अभिनेतालोकांना सतत हसवणारी व्यक्ती जेव्हा एखाद्या गंभीर भूमिक ा करते तेव्हा ती लोकांच्या काळजाला जास्त भिडते, असे मला वाटते. मकरंद अनासपुरे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात असे नाहीत. त्यांच्या या चित्रपटातील विलक्षण अभिनयासाठी हा चित्रपट सर्वांनी पाहावा, असे मला वाटते. - प्रसाद नामजोशी, दिग्दर्शक
‘रंगा पतंगा’तून वास्तव दाहकतेची मांडणी
By admin | Published: March 31, 2016 2:20 AM