साउथ सुपरस्टार प्रभासचा बहुचर्चित सिनेमा ‘साहो’ पुन्हा एकदा वादात सापडला आहे. होय, सर्वप्रथम बॉलिवूड अभिनेत्रीने लिसा रे हिने या चित्रपटाच्या मेकर्सवर चोरीचा आरोप केला होता. आता फ्रेंच दिग्दर्शक जेरोम साले याने ‘साहो’वर कॉपी केल्याचा आरोप केला आहे.होय, जेरोम यांनी एक पोस्ट लिहित, ‘साहो’ हा त्यांच्या ‘लार्गो विंच’ या चित्रपटाची कॉपी असल्याचा आरोप केला आहे. ‘असे वाटते की, ‘लार्गो विंच’ची ही दुसरी कॉपी पहिल्यासारखीच खराब आहे. प्लीज, तेलगू डायरेक्टर, माझे काम चोरले तर कमीत कमी योग्यरित्या चोरा’, असे जेरोम यांनी म्हटले आहे.
याआधी 2018 मध्ये साऊथ दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास यांच्यावर ‘लार्गो विंच’ची कॉपी केल्याचा आरोप केला गेला होता. आता ‘साहो’च्या मेकर्सवरही या चित्रपटाची कॉपी केल्याचा आरोप होत आहे.
लिसा रेने केला होता गंभीर आरोप
अभिनेत्री लिसा रे हिने ‘साहो’च्या मेकर्सवर शिलो शिव सुलेमान यांच्या आर्टवर्कची कॉपी केल्याचा आरोप केला होते. लिसाने इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले होते.. यातील एका फोटो लिसाने ‘साहो’तील एक सीन शेअर केला होता आणि दुस-या फोटोत समकालीन आर्टिस्ट शिलो शिव सुलेमान यांचे एक चित्र शेअर केले होते. ‘हे चुकीचे आहे. याविरोधात बोलायलाच हवे. या मेकर्सला आरसा दाखवून हे गैर असल्याचे सांगावेच लागेल. बिग बजेट चित्रपटात शिलोचे ओरिजनल चित्राशी छेडछाड करून वापरले गेले. ही प्रेरणा नाही तर खुलेआम केलेली चोरी आहे. हे जगात स्वीकार्य नाही. प्रॉडक्शन टीमने चित्राचा वापर करण्याआधी ना आर्टिस्टशी संपर्क केला ना, त्यांची परवानगी घेतली,’ असे लिसाने लिहिले होते.
‘साहो’ हा सिनेमा सुजीत यांनी दिग्दर्शित केलेला आहे. चार भाषांत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात प्रभास आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहेत.