पूर्वी वर्षाला जेमतेम चित्रपटांची निर्मिती केली जात असल्याने प्रेक्षकांना नव्या चित्रपटांची उत्सुकता लागलेली असायची. त्यातही बरेचसे निर्माते बॉक्स आॅफिसवर गल्ला जमविण्यासाठी दिवाळी, ईद, ख्रिसमस या सणांनाच आपले चित्रपट प्रदर्शित करायचे. आता मात्र चित्रपटांची संख्या वाढली आहे. त्यातही ज्यांना जी भाषा आवडते त्या भाषेतील चित्रपट दर शुक्रवारी पाहायला मिळत आहेत. बॉलीवूड, हॉलीवूड अन् मराठी मुव्हीजचा धमाका एकत्र अनुभवता येत आहे. या शुक्रवारीही असेच काहीसे चित्र होते. त्याचाच हा आढावा...बॉलीवूड, हॉलीवूड अन् मराठी मुव्हीजचा एकत्र धमाकाया फ्रायडेला एक-दोन नव्हे तर तब्बल आठ ते दहा चित्रपट रीलीज झाले आहेत. त्यात बॉलीवूडचे ‘तेरे बिन लादेन : डेड आॅर अलाइव्ह, अलीगढ, लव्ह शगुन’, हॉलीवूडचे ‘द रेवेनेंट, गॉड्स आॅफ इजिप्त, ट्रिपल-९’ तर मराठीत ‘बाबांची शाळा, तिचा उंबरठा’ या चित्रपटांचा समावेश आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या फ्रायडेला कॉमेडी, अॅक्शन अन् इमोशनल ड्रामा याचा अनुभव घेता येईल. द रेवेनेंटएलेहांद्रो गोंसालेस इनयारिटू दिग्दर्शित ‘द रेवेनेंट’ या हॉलीवूडपटात तुफान अॅक्शन बघावयास मिळणार आहे. इंग्रजी चित्रपटांचा एक खास चाहतावर्ग आहे. त्यातही अॅक्शन चित्रपटांबाबत क्रेझी असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ‘द रेवेनेंट’ हा चित्रपट अशा प्रेक्षकांसाठी अगदी परफेक्ट आहे. त्यातील साहसदृश्ये या प्रेक्षकांना अजिबात निराश करीत नाहीत.‘गॉड्स आॅफ इजिप्त’ आणि ‘ट्रिपल-९’हे दोन्ही चित्रपटदेखील अॅक्शनवरच आधारित आहेत. त्यांचीही बरीच जाहिरात झाल्याने इंग्रजी चित्रपटांचे चाहते या चित्रपटांची प्रतीक्षा करीत होते. ती प्रतीक्षा आता संपली आहे. तेरे बिन लादेन : डेड आॅर अलाइव्ह२०१० मध्ये आलेल्या ‘तेरे बिन लादेन’ या कॉमेडी चित्रपटाचा सीक्वेल असलेल्या ‘तेरे बिन लादेन : डेड आॅर अलाइव्ह’ हा चित्रपटदेखील प्रेक्षकांना खदखदून हसविणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता तो प्रत्यक्ष रीलीज झाला आहे. हा चित्रपट हिंदी असला तरी याला उर्दूचा तडका देण्यात आल्याने भाषेची धम्माल यात पाहायला मिळणार आहे.अलीगढ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या बायोपिक चित्रपटातून प्रा. डॉ. श्रीनिवास रामचंद्र सिरास याची कथा प्रेक्षकांसमोर मांडली गेली आहे. समलैंगिकतेवर आधारित असल्याने या चित्रपटाबाबत अनेक वादही जोडले गेले आहेत. काही जण तर या चित्रपटाच्या विरोधात कोर्टातही गेलेत. पण कोर्टाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यास मनाई केली आहे. हिंदी भाषिक प्रेक्षक या चित्रपटाला गर्दी करीत आहेत. ‘बाबांची शाळा’ आणि ‘तिचा उंबरठा’ हे दोन अस्सल मराठमोळे चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित झाले. मराठी प्रेक्षकांना या चित्रपटांची हृदयस्पर्शी कथा आवडेल, अशी अपेक्षा या चित्रपटांचे दिग्दर्शक करीत आहेत. या चित्रपटातून प्रेक्षकांना इमोशनल ड्रामा बघावयास मिळेल. एकूणच हा आठवडा प्रेक्षकांसाठी विविध भाषांतील चित्रपटांची मेजवानी घेऊन आला आहे हे नक्की.
फ्रायडे पॅकेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2016 3:48 AM