Vikram Vedha, Ponniyin Selvan 1 day 1 Box Office Collection : काल शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर दोन नवे सिनेमे झळकले. एक साऊथचा अन् एक बॉलिवूडचा. एकीकडे साऊथचा ‘पोन्नियिन सेल्वन 1’ (Ponniyin Selvan 1 ) रिलीज झाला तर दुसरीकडे साऊथ सिनेमाचा हिंदी रिमेक ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha)धडकला. पहिल्या दिवशी या दोन्ही चित्रपटांनी किती कमाई केली, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना असणारच. तर सुरूवातीचे आकडे समोर आले आहेत.
विक्रम वेधाहृतिक रोशन, सैफ अली खानच्या ‘विक्रम वेधा’चं जोरदार प्रमोशन झालं. अॅडव्हान्स बुकिंगचाही कल्ला केला गेला. समीक्षकांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं. पण याऊपर प्रत्यक्षात ‘विक्रम वेधा’ला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाला. भारतात 4007 स्क्रिन्सवर हा सिनेमा रिलीज झाला. पहिल्या दिवशीच्या ओपनिंग कलेक्शनच्या बाबतीत बोलायचं तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी एकूण 11.50 कोटींचा बिझनेस केला. हे सुरूवातीचे आकडे आहेत. यात थोडा फार फरक पडू शकतो. पण फार मोठा फरक पडण्याची शक्यता नाही.
अॅडव्हान्स बुकिंगमधून या चित्रपटाने ग्रॉस 2.97 कोटींची गल्ला जमवला. 2022 व्या सर्वाधिक ओपनिंग देणाऱ्या सिनेमात ‘ब्रह्मास्त्र’ अव्वल स्थानी आहे. या चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी 36 कोटींचा बिझनेस केला होता. हृतिक व सैफच्या ‘विक्रम वेधा’चं ओपनिंग कलेक्शन यावर्षीच्या अनेक मोठ्या फ्लॉप सिनेमांपेक्षाही कमी आहे. लाल सिंग चड्ढा, बच्चन पांडे या चित्रपटापेक्षाही ‘विक्रम वेधा’चं ओपनिंग डे कलेक्शन कमी आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ने पहिल्या दिवशी 11.70 कोटींची कमाई केली होती. तर ‘बच्चन पांडे’ने 13.25 कोटी कमावले होते. अर्थात शनिवारी व रविवार या ‘विक्रम वेधा’साठी फायद्याचा ठरेल, असं जाणकारांचं मत आहे.
पोन्नियिन सेल्वन 1
‘पोन्नियिन सेल्वन 1’ हा दिग्दर्शक मणिरत्नम यांचा मेगाबजेट सिनेमा सुद्धा शुक्रवारी रिलीज झाला. या मल्टीस्टार सिनेमात ऐश्वर्या राय, चियान विक्रम, तृषा कृष्णन, जयराम रवी, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलिपाला, कार्ति असे अनेक दिग्गज स्टार्स आहेत. ‘पोन्नियिन सेल्वन 1’ने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने सर्व भाषेत मिळून पहिल्या दिवशी सुमारे 37.5 कोटींचा बिझनेस केला आहे. या चित्रपटाने कमल हासनच्या ‘विक्रम’च्या ओपनिंग डे कलेक्शनला मागे टाकत एक विक्रम रचला.