बॉलिवूडचा लोकप्रिय सिने दिग्दर्शक रोहित शेट्टी(Rohit Shetty)ने 'स्कूल कॉलेज आणि लाइफ' (School collage Aani Life) या चित्रपटातून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन विहान सूर्यवंशीनं तर निर्मिती रोहित शेट्टीनं केलीय. हा चित्रपट १४ एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटात तेजस्वी प्रकाश (Tejaswi Prakash) आणि करण परब (Karan Parab) मुख्य भूमिकेत आहे. हा कौटुंबिक सिनेमा शाळा आणि महाविद्यालयीन आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रोहित शेट्टी, तेजस्वी प्रकाश आणि करण परब यांनी लोकमत फिल्मीच्या फिल्मी पंचायत या कार्यक्रमात हजेरी लावली होती.
करण परब दुबईत लहानाचा मोठा झाला आहे. त्याचं शालेय जीवन तिथेच पूर्ण झालं आहे. युएईच्या १९ वर्षांखालील क्रिकेट टीममधूनदेखील तो खेळला आहे. याबद्दल अभिनेता म्हणाला की, माझ्या बाबांना मी क्रिकेटर व्हावं असं वाटतं होतं. एकदा माझ्या कोचनं बाबांना म्हटलं होतं की हा राहुल द्रविडसारखा खेळतो. त्यानंतर त्यांना मी क्रिकेटरच व्हावं असं वाटत होतं. शारजाहच्या क्रिकेट अकॅडमीत मी प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर मी दुबई क्रिकेट अकॅडमीमध्ये खेळू लागलो. मग युएईला रिप्रेझेंट केलं. तेव्हा मी १३ वर्षांचा होतो. पण त्यानंतर मी पुण्यात आलो. तिथे कॉलेजमध्ये असताना आयुष्यात खूप छान छान गोष्टी असल्याचे जाणवले. मी नाटकात काम करू लागलो आणि अभिनयात आलो.
तर करण परबने चित्रपटाबद्दल सांगितले की, शालेय आणि कॉलेज जीवनात प्रत्येकाला घाई असते की आपण कधी मोठे होणार..कधी आपलं शिक्षण पूर्ण होणार..कधी मी कमवेन..कधी मी यातून मोकळा होणार. पण जेव्हा आपण घराबाहेर पडतो..कमावयला लागतो. तेव्हा आपल्याला कळतं की शाळा आणि कॉलेजमध्ये असतानाची ती मज्जा मस्ती आणि निरागसता निघून जाते. तेव्हा माहित नसते की आयुष्य पुढे जावून गुंतागुंतीचं बनणार आहे. या चित्रपटातही तेच दाखवण्यात आले आहे की आपण पटकन मोठे होते आणि आयुष्यभर आपण शाळा आणि कॉलेजबद्दल बोलत बसतो. हीच या चित्रपटाची ब्युटी आहे. शाळेतून बाहेर पडलो की आयुष्य आपली शाळा घेते असे म्हणणे वावगे ठरणार नाही.