‘गदर २’ हा बॉलिवूड चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर घुमाकूळ घालत आहे. १० ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. या चित्रपटात सनी देओल, अमीषा पटेल आणि उत्कर्ष शर्मी मुख्य भूमिकेत आहेत. ‘गदर २’ने बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा टप्पा पार करत विक्रमी कमाई केली आहे. नुकतीच ‘गदर २’ची सक्सेस पार्टीही करण्यात आली. २००१ साली प्रदर्शित झालेल्या गदरचा ‘गदर २’ हा सीक्वल आहे. तब्बल २२ वर्षांनी प्रदर्शित झालेल्या गदरच्या सीक्वलवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत.
‘गदर’मधील तारा सिंह आणि सकिनाची जोडी प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली होती. या चित्रपटातील तारा सिंह या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. अभिनेता सनी देओलने साकारलेली तारा सिंहची भूमिकेने प्रेक्षकांना वेड लावलं. या चित्रपटातील तारा सिंहचे संवादही प्रचंड व्हायरल झाले होते. ‘गदर २’ला मिळालेल्या यशानंतर दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. यातील एका मुलाखतीत त्यांना तारा सिंहच्या व्यक्तिरेखेसाठी आताच्या सुपरस्टारपैकी कोणाची निवड केली असती? असा प्रश्न विचारण्यात आला.
यावर उत्तर देताना अनिल शर्मा यांनी दाक्षिणात्य अभिनेत्याचं नाव घेतलं. ते म्हणाले, “बॉलिवूडमध्ये सनी पाजीशिवाय ही व्यक्तिरेखा कोणी करून शकेल, असं मला वाटत नाही. पण दाक्षिणात्य सुपरस्टारपैकी तारा सिंहची भूमिका ज्युनिअर एनटीसारखा अभिनेता करू शकेल. पण, बॉलिवूडमध्ये मला तसं कोणीही दिसत नाही.”
‘गदर २’ चित्रपटात गदरमधील लोकप्रिय ठरलेली ‘उड जा काले कावा’ आणि ‘मै निकला गड्डी लेके’ या गाण्यांचा रिमेकही आहे. या चित्रपटात मनिष वाधवा, सिमरत कौर, गौरव चोप्रा या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहे. बापलेकाच्या नात्याची भावनिक गोष्ट या चित्रपटातून दाखविण्यात आली आहे.