मनोज ताजनेगडचिरोली : आदिवासीबहुल जिल्हा म्हणून राज्यातच नाही तर देशात परिचित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील ‘कुरमाघर’ प्रथेची ओळख ‘लोकमत’मुळे राज्यातील इतर जिल्ह्यांना बऱ्यापैकी झाली. पण आता याच प्रथेवर तयार झालेल्या लघुपटाच्या माध्यमातून या कुरमाघरांची कथा आणि व्यथा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. इटली येथे होत असलेल्या इंटरनॅशनल ह्युमन इन्व्हायर्नमेंट केअर फिल्म फेस्टिवलमध्ये या लघुपटाला नामांकन मिळून उपांत्य फेरीतही प्रवेश मिळाला आहे. याशिवाय रशियातील मॉस्को येथील शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्येही नामांकन मिळाले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि विशेष: माडिया जमातीचे प्राबल्य असणाऱ्या गावांमध्ये मासिक पाळीदरम्यान संबंधित मुली, महिलांना कुरमाघर नावाच्या झोपडीत पाच दिवस राहायला जावे लागते. त्या ठिकाणी तिला ज्या असुविधा आणि असुरक्षित वातावरणात राहावे लागते तीच व्यथा ‘कुरमाघर’ नावाच्या या लघुपटातून मांडण्यात आली आहे. मूळच्या औरंगाबाद येथील पण सध्या मुंबईच्या फिल्मी दुनियेत कॉरिओग्राफी करणाऱ्या अविनाश शेजवळ या युवकाने या लघुपटाची स्क्रिप्ट लिहून दिग्दर्शनही केले आहे. विशेष म्हणजे कुरमाघराबद्दल वृत्तपत्रात आलेल्या माहितीच्या आधारे आणि गडचिरोलीतील स्पर्श या संस्थेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर शेजवळ यांनी हा लघुपट हिंदीतून तयार केला. त्यात औरंगाबादच्या प्रांजल सुरडकर आणि पूजा गायकवाड यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत. याशिवाय कॅमेरामन अभिजित पाटील, रोहित रायकर, प्रॉडक्शन हेड म्हणून दीपक साठे व क्रिएटिव्ह हेड म्हणून गौतम शेजवळ यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
अनेक फेस्टिव्हलमध्ये मिळाले स्थान
डिसेंबर २०१९ मध्ये तयार केलेल्या या लघुपटाने आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात नामांकन मिळविले आहे. यात जपान, कॅनडा, कॅलिफोर्निया, बांगलादेश आदी देशांसह गोवा, पुणे, सिंधुदुर्ग, इंदापूर येथील लघुपट महोत्सवातही या लघुपटाला स्थान मिळाले आहे. आता मॉस्को येथील महोत्सवातही नामांकन मिळाले असून पुढील महिन्यात त्याचा निकाल जाहीर होणार आहे. याशिवाय इटली येथील महोत्सवात उपांत्य फेरीपर्यंत मजल गाठली आहे.