Gandhi Godse Ek Yuddh : महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्या विचारसरणीत कमालीची तफावत होती. या दोघांच्या विचारांचे युद्धच जर मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळाले तर? घायल,दामिनी, घातक, खाकी सारख्या चित्रपटांचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजकुमार संतोषी ९ वर्षांनंतर पुन्हा दिग्दर्शकाच्या भुमिकेत परतले आहेत. त्यांच्या 'गांधी-गोडसे एक युद्ध' या सिनेमाची घोषणा आज करण्यात आली आहे. मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) देखील सिनेमाचा भाग असणार आहे.
स्वातंत्र्याच्या काळातील विचारसरणींमध्ये दिसलेली तफावत ती म्हणजे महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांची. अहिंसेच्या मार्गाने चालणारे बापू आणि गरज असेल तिथे हिंसा दाखवलीच पाहिजे अशा विचारांचे नथुराम गोडसे होते.नथुराम गोडसेंवर 'मी नथुराम गोडसे बोलतोय' हे नाटक आले, त्यांच्यावर पुस्तकही आहे. तसेच महात्मा गांधींवरही अनेक कलाकृती झाल्या आहेत. आता या दोघांच्या विचारातले युद्धच मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी राजकुमार संतोषी घेऊन आले आहेत.
गांधी-गोडसे एक युद्ध हा सिनेमा पुढील वर्षी २६ जानेवारी ला प्रदर्शित होणार आहे. आज सिनेमाचा टायटल व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सिनेमाविषयी आणखी माहिती लवकरच सांगण्यात येईल. ए आर रेहमान यांनी सिनेमासाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. तर दुसरीकडे शाहरुख खान अनेक वर्षांनी पठाण मधून चाहत्यांच्या भेटीला येतोय. 'पठाण' २५ जानेवारी रोजी रिलीज होत आहे तर 'गांधी गोडसे एक युद्ध' २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.