अभिनेता स्वप्निल जोशीकडे गेल्या ६९ वर्षांपासून गणपती बाप्पा येत आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाने त्याच्या घराचे वातावरण पूर्णपणे बदलून गेले आहे. घरातील सगळी मंडळी गणपती बाप्पाच्या सेवेत मग्न झालेली असून गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी स्वप्निलचे कुटुंबीय, मित्रमैत्रीण दरवर्षी आवर्जून त्याच्या घरी येतात. त्याच्या घरी लोकांची रिघच लागलेली असते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.
स्वप्निलकडे दीड दिवसांचा गणपती बाप्पा असतो. स्वप्निल कामात कितीही व्यग्र असला तरी दीड दिवस तो चित्रीकरण न करता घरीच बाप्पाची भक्तिभावाने पूजा करतो. स्वप्निल, त्याचे आई-वडील, त्याची पत्नी लीना आणि त्याची मुलगी मायरा आणि मुलगा राघव मिळून गणेशाची पूजा करतात. गणपती बाप्पाच्या आगमनाने त्याच्या मुलांना चांगलाच आनंद झाला आहे. आपल्या घरातील गणपती बाप्पाविषयी स्वप्निल सांगतो, गेली ६९ वर्षं माझे आई बाबा घरी गणपती बाप्पा आणत आहेत. आमच्याकडे दरवर्षी आमचे नातलग, मित्रमंडळी, आमच्या कॉलनीतील लोक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. राघवचे हे गणपतीचे पहिलेच वर्षं असल्याने त्याच्यासाठी हे सगळे काही नवीन आहे. गणरायाच्या आमगनाने मायरा आणि राघव दोघेही प्रचंड खूश झाले आहेत. गणपती बाप्पा घरी आल्यामुळे एक वेगळ्या प्रकारची एनर्जी घरात निर्माण होते असे मला वाटते.
आपण सर्वांनी प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा केला पाहिजे असे आपण नेहमीच म्हणत असतो. गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते याचा लोक विचारच करत नाही. पण स्वप्निल दरवर्षी प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करतो. त्याच्या घरातील गणरायाच्या मुर्तीचे कधीच विसर्जन केले जात नाही. केवळ एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन ती मुर्ती त्यात तीन वेळा विसर्जित केली जाते आणि पुन्हा देवघरात तिची स्थापना केली जाते.
स्वप्निल आणि त्याचे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करत आहेत. त्याच्या कुटुंबियांकडून सगळ्यांनीच ही गोष्ट शिकण्याची गरज आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनात आपला देखील हातभार नक्कीच लागतो.