Shubhankar Tawde on Ganeshotsav : सध्या संपूर्ण राज्यात गणोशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहेत. गणेशोत्सव हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. गणपती म्हटलं की, मुंबईत राहणाऱ्या सगळ्यांनाच आपल्या कोकणातील घराची आठवण येऊ लागते. गणपतीबद्दल असणारी भावना, बालपणी साजरा केलेला उत्सव असं मनात गणेशमय आठवणींचं एक कोलाज तयार झालेलं असतं. नुकतंच अभिनेता शुभंकर तावडे याने कोकणातल्या गणेशोत्सवाच्या आठवणी शेअर केल्या.
शुभंकर तावडे हा 'लाईक आणि सबसक्राईब' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच सकाळला दिलेल्या मुलाखतीमध्ये शुभंकरने गणेशोत्सवातील बालपणीच्या आठवणी सांगितल्या. तो म्हणालो, "गणपतीत नेहमी गावी जायचो. पावसाचे दिवस असल्याने गावी गेल्यानंतर मातीचा सुगंध आणि गणरायाचं स्वागत हे कधीच आठवणीतून जात नाही".
पुढे तो म्हणाला, "कोकणात भरपूर विधी चालतात. म्हणजे भजनासाठी किंवा आरतीसाठी गावातले सर्व लोक गोळा होतात. हे सर्व मला आठवतं. काम करायला लागल्यापासून माझं कोकणता जाणे कमी झालं आहे. नाहीतर कॉलेजमध्ये असताना मी गणपतीला गावी जायचो. गावात आम्ही जवळपास ३० ते ३५ घरी जायचो, आरती करायचो आणि पिशवी भरून प्रसाद आणायचो. मग तो वाटायचो", अशा आठवणी त्याने सांगितल्या.
शुभंकर तावडे मूळचा कोकणातला आहे. शुभंकरचे वडील मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळेच अभिनयाचं बाळकडू शुभंकरला घरातूनच मिळालं. शुभंकर ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे (Sunil Tawde ) यांचा मुलगा आहे. सुनील तावडे गेली अनेक वर्षे मराठी इंडस्ट्री मध्ये कार्यरत आहेत. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. वडीलांप्रमाणेच शुभंकर एक गुणी अभिनेता आहे.