‘संजू’ हा अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट पाहून गँगस्टर अबू सलेम संतापला आहे. केवळ संतापलाच नाही तर याबद्दल त्याने चित्रपटांच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. होय, या चित्रपटात आपल्याबद्दल चुकीची माहिती दाखवली गेली, असा त्याचा आरोप आहे. १५ दिवसांच्या आत ‘संजू’च्या निर्मात्यांनी माफी मागावी. असे न झाल्यास अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा अबू सलेमने आपल्या नोटीसमध्ये दिला आहे.‘संजू’मध्ये संजय दत्तचे ड्रग्जचे व्यसन, त्याचे अंडरवर्ल्डशी असलेले कनेक्शन, तुरुंगवास असे अनेक प्रसंग दाखवले आहेत. लोकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला. या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवरचे अनेक रेकॉर्ड तोडलेत. पण आता रिलीजनंतर इतक्या दिवसांनी हा चित्रपट वादात सापडला आहे. अबू सलमेच्या या नोटीसनंतर ‘संजू’चे मेकर्स काय निर्णय घेतात, ते बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
बॉलिवूडचा अभिनेता संजय दत्तच्या जीवनावरील चित्रपट संजू चित्रपट पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती आणि या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. यातील प्रत्येक भूमिकेचे कौतुक झाले. संजय दत्तची भूमिका साकारणारा अभिनेता रणबीर कपूरच्या अभिनयही प्रेक्षकांना खूप भावला. या चित्रपटाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या ५ चित्रपटांच्या यादीतही स्थान मिळवले आहे. आता टॉप ४ मध्ये येण्यासाठी या चित्रपटाची सलमान खानच्या 'टायगर जिंदा है' या चित्रपटाशी टक्कर असणार आहे.
प्रदर्शनानंतर ३ आठवड्यात संजू चित्रपटाने ३२०.८० कोटींचा गल्ला जमवल्याने हिंदी सिनेसृष्टीतील ५ सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत 'संजू'चा समावेश झाला होता. आता या चित्रपटाची कमाई ३३३.५५ कोटी एवढी झाली आहे. सलमानच्या 'टायगर जिंदा है' चित्रपटाने ३३९.१६ कोटी एवढी कमाई केली होती. या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडून टॉप ४ मध्ये स्थान मिळवण्यात संजूला केवळ ६ कोटींची गरज आहे.