मुंबई : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगुबाई कठियावाडी’ या चित्रपटात कामाठीपुराचा उल्लेख असल्याने ते हटविण्याचे आदेश द्यावेत, यासाठी काँग्रेसचे आमदार अमिन पटेल व कामाठीपुरा भागातील रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कामाठीपुराऐवजी ‘मायानगरी’, ‘मायापुरी’ अशी नावे घेतली तरी चालतील, असे याचिकेत म्हटले आहे.
कामाठीपुरातील रहिवासी श्रद्धा सुर्वे यांनी ‘गंगुबाई कठियावाडी’विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत असल्याने तातडीने सुनावणी घेण्याची विनंती सुर्वे यांच्या वकिलांनी केली. त्यावर न्या. गौतम पटेल व न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी बुधवारी ठेवली.
तसेच काँगेसचे आमदार अमिन पटेल यांनीही या चित्रपटावर आक्षेप घेणारी जनहित याचिका न्यायालयात दाखल केली. मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्याही खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी बुधवारी ठेवली. लेखक एस. हुसैन झैदी यांच्या ‘क्विन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकातील एका अध्यायावर आधारित हा चित्रपट आहे. १९६० च्या काळात कामाठीपुरात दबदबा असलेल्या गंगुबाई काठीयावाडीच्या भूमिकेत आलिया भट आहे.
रहिवाशांची, महिलांची बदनामी होईलचित्रपटात कामाठीपुरा हा खराब परिसर दाखविण्यात आला आहे. या परिसरातील रहिवाशांची व महिलांची बदनामी होईल, असे याचिकेत म्हटले आहे.