अभिनेत्री आलिया भट हिने अखेर संजय लीला भन्साळींचा सिनेमा साईन केलाच. होय, सर्वप्रथम भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’मध्ये आलियाची वर्णी लागली होती. पण अचानक भन्साळींनी हा प्रोजेक्ट रद्द केला. पण हो, आलियासाठी नव्या प्रोजेक्टची तजवीज मात्र केली. आता आलिया भन्साळींच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या सिनेमात झळकणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला.आलिया या सिनेमात एका धमाकेदार रुपात महिला गँंगस्टरची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. मंगळवारी ‘गंगूबाई काठियावाडी’चित्रपटाचा टीझर पोस्ट करण्यात आला होता. तर आज आलिया हिचा चित्रपटातील पहिला लूक समोर आला.
आलिया पहिल्यांदाच या चित्रपटातून एका महिला गँगस्टरची भूमिका साकारत आहे. त्यामुळे आलियाचा हा चित्रपट तिच्या पुढील करियरसाठी कलाटणी देणारा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
आलियाच्या चित्रटातील लूक बाबत बोलायचे झाल्यास, डिपनेक ब्लाऊज, कपाळावर कुंकू, नाकात नथ, लांब स्कर्ट असा तिचा लूक आहे. चित्रपटाची कथा ही हुसैन जैदी ‘माफिया क्विन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर बेतलेली आहे. पण खरी कथा ही गंगूबाई काठीयावाडी हिच्या आयुष्यावर आधारित आहे.
कोण आहे गंगूबाई?
‘माफिया क्विन ऑफ मुंबई’ या पुस्तकानुसार, गंगूबाई गुजरातच्या काठियावाडमध्ये राहणारी होती. त्यामुळे तिला काठियावाडी म्हटले जात असे. लहान वयात गंगूबाईला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले गेले. कुख्यात गुन्हेगार गंगूबाईकडे येत. मुंबईच्या कमाठीपुरा भागात गंगूबाई ‘कोठा’ चालवायची. या गंगूबाईने सेक्सवर्करच्या मुलांसाठी प्रचंड मोठे काम केले.गंगूबाई काठियावाडीचे खरे नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी होते. गंगूबाईला लहानपणी अभिनेत्री बनायचे होते. वयाच्या 16 व्या वर्षी गंगूबाईला तिच्या वडिलांच्या दिवाणजीसोबत प्रेम झाले आणि ती त्याच्यासोबत लग्न करून मुंबईला पळून आली. आपला पती मुंबईत गेल्यावर आपल्याला धोका देईल, याचा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. पण पतीने केवळ 500 रूपयात गंगूबाईला एका कोठ्यावर विकले. ‘माफिया क्विन आॅफ मुंबई’ या पुस्तकात माफिया डॉन करीम लाला याचाही उल्लेख आहे. करीम लालाच्या गँगच्या एका गुंडाने गंगूबाईवर बलात्कार केला होता. यानंतर न्याय मिळवण्यासाठी गंगूबाई करीम लालाला भेटली आणि राखी बांधून तिने त्याला आपला भाऊ बनवले. काहीच वर्षांत करीम लालाप्रमाणे गंगूबाईचा दबदबा निर्माण झाला आणि कामठीपुºयाची सर्व लगाम गंगूबाईच्या हाती आली. गंगूबाई म्हणायला कोठा चालवायची. पण तिने कुठल्याही मुलीला तिच्या मर्जीविरूद्ध कोठ्यावर आणले नाही.