चौसष्ट कलेची देवता अशी ओळख असलेला लाडका गणराया लहान मुलांचा सर्वात आवडता देव. गणरायांच्या आगमनाचे या बालमित्रांना कायमच वेध लागलेले असतात. अनेकांसाठी तो आपला लाडका बाप्पा असतो तर काही जणांसाठी तो खास दोस्तही असतो. बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत प्रत्येक मंडळात छोटे गणेशभक्त कायम सज्ज असलेले बघायला मिळतात मग अशा वेळी सूर नवा ध्यास नवा मधील छोटे सूरवीर तरी कसे मागे राहणार. या सूरवीरांनीही मग आपल्या गणेश मंडळाची स्थापना केली आणि अतिशय दणक्यात गणरायांचं स्वागत केलं.
आपल्या गाण्याने सर्वांची मने जिंकणारा नागपूरचा उत्कर्ष वानखेडे अनेक कलांमध्ये पारांगत आहे. तो एक उत्तम मूर्तिकार आहे. उत्कर्षचे आजोबा आणि वडील हे सुद्धा दरवर्षी स्वतः शाडूच्या मातीची गणेशमूर्ती बनवतात. उत्कर्ष त्यांच्याकडूनच ही कला शिकला. त्यामुळे सूर नवा ध्यास नवासाठीही उत्कर्षने एक खास मूर्ती तयार केली. या कामात त्याला आपला मॉनिटर म्हणजेच हर्षद नायबळच्या वडिलांनी म्हणजेच अंगद नायबळ यांनी विशेष मदत केली. अंगद नायबळ सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून स्वतः घरी गणपतीची मूर्ती तयार करतात. उत्कर्षने ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर बाकीच्या बच्चेकंपनीनेही उत्साह दाखवत इतर सजावटीची जबाबदारी उचलत हार, पताकेपासून रांगोळीपर्यंत सर्व सजावट स्वतःहून केली. ही सगळी गंमत प्रेक्षकांना या कार्यक्रमाच्या आगामी भागांमध्ये बघायला मिळणार आहे.
आपल्या गायकीने केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात आपले चाहते ज्यांनी तयार केले असे गायक म्हणजे महेश काळे. आपल्या सुरांच्या जादूने ते प्रेक्षकांना कायम मंत्रमुग्ध करतात. महेश काळेंच्या सुरांची हीच अनुभती या गणपती विशेष भागामधून प्रेक्षकांना येणार आहे. कट्यार काळजात घुसली या चित्रपटामधील सूर निरागस हो या गाण्यामधून त्यांनी गणरायाला सुरांजली वाहिली. मंगळवारी प्रसारित होणाऱ्या भागामधून प्रेक्षकांना या गाण्याचा आनंद घेता येणार आहे.
सूर नवा ध्यास नवाचा हा गणपती विशेष भाग म्हणजे गणेश भक्तांसाठी खास मेजवानी असणार आहे. यात छोट्या सूरवीरांनी एकाहून एक सरस अशी गणेशभक्ती गीते गायली. ज्यामध्ये सक्षम सोनावणेने तूच सुखकर्ता तूच दुखहर्ता, उत्कर्ष वानखेडेने तूच माझी आई देवा तूच माझा बाप, चैतन्य देवडेने देवा श्रीगणेशा, आदी भरतीयाने प्रथम तुला वंदितो, अभिेषेक कांबळेने देवा तुझ्या दारी आलो, साहिल पांढरेने ओंकार स्वरुपा ही गाणी सादर केली. तर मुलींमध्ये अंशिका चोणकरने उठा उठा हो, नेहा केणेने तूज मागतो मी आता, विश्वजा जाधवने रांजणगावाला गावाला, स्वराली जाधवने आधी गणाला रानी आणला, मीरा निलाखेने तुझ्या कांतीसम, सृष्टी पगारेने बंधू येईल माहेरी न्यायला ही गाणी सादर केली.