Join us

"वडील वारले की केस कापावे लागतात", नेटकऱ्याला गश्मीरने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला, "टक्कल केलं असतं..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2023 10:42 AM

वडिलांच्या निधनावरुन प्रश्न विचारणाऱ्याला गश्मीरने सुनावले खडे बोल

मराठीबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावणारा हँडसम हंक म्हणजे गश्मीर महाजनी. मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये त्याने विविधांगी भूमिका साकारल्या. ‘पानीपत’, ‘सरसेनापती हंबीरराव’ यांसारख्या चित्रपटात गश्मीर ऐतिहासिक भूमिकाही साकारताना दिसला. गश्मीरने अभिनय आणि अपार मेहनतीच्या जोरावर कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. गश्मीरचे वडील रवींद्र महाजनी हेदेखील ज्येष्ठ अभिनेते होते. मराठी कलाविश्वातील देखणा हिरो अशी त्यांची ओळख होती. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयाकडे वळलेल्या गश्मीरला मात्र त्यांच्या निधनानंतर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

रवींद्र महाजनी यांचं १५ जुलैला कार्डियक अरेस्टने निधन झालं. त्यांचा मृतदेह बंद खोलीत आढळला होता. रवींद्र महाजनी कुटुंबीयांपासून दूर एकटेच राहत होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर गश्मीर व त्याच्या कुटुंबीयांवर टीका करण्यात आली होती. वडिलांच्या निधनानंतर गश्मीरने त्याची बाजू मांडत ट्रोलर्सच्या या प्रश्नांना उत्तरं दिली होती. नुकतंच गश्मीरने इन्स्टाग्रामवर #askme सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये एका नेटकऱ्याने गश्मीरला वडिलांच्या निधनानंतर करण्यात येणाऱ्या विधींबाबत प्रश्न विचारला. त्याला गश्मीरने सडेतोड उत्तर दिलं आहे.

एका युजरने गश्मीरला “वडील वारले की केस कापतात, यावर काय बोलाल? मला तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल”, असं विचारलं होतं. या नेटकऱ्याला गश्मीरने उत्तर देत खडे बोल सुनावले आहेत. “मी जे काम करतो, त्यावर माझ्या कुटुंबाचं अर्थजन होतं. टक्कल केलं असतं तर हातातून कामं गेली असती. जे माझ्यावर अवलंबून आहेत, त्यांची जबाबदारी तुम्ही घेतली असती का?” असं उत्तर गश्मीरने दिलं आहे.

दरम्यान, गश्मीर सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबद्दल तो चाहत्यांना माहिती देत असतो. सरसेनापती हंबीरराव चित्रपटात गश्मीरने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. पुन्हा एकदा गश्मीर या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्ट शेअर करत त्याने ही माहिती दिली आहे.

टॅग्स :गश्मिर महाजनीरवींद्र महाजनीमराठी अभिनेतामराठी चित्रपट