Join us

कठीण प्रसंगात मराठी इंडस्ट्रीतून कोण मदतीला आलं? गश्मीर म्हणाला, 'काही लोक...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 09:40 IST

गश्मीरने इन्स्टाग्रामवर चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आहेत.

मराठीतील हँडसम अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांच्या निधनानंतर संपूर्ण मनोरंजनसृष्टी हळहळली. इतक्या देखण्या आणि यशस्वी अभिनेत्याचा अशाप्रकारे मृत्यू व्हावा हे अनेकांच्या पचनी पडलं नाही. दोन दिवस त्यांच्या मृतदेह ते राहत असलेल्या तळेगावच्या फ्लॅटवर तसाच होता. दोन दिवस कुटुंबाने काहीच संपर्क केला नाही का असा प्रश्न सर्वांनी उपस्थित केला. दरम्यान रवींद्र महाजनी यांच्या निधनाला २० दिवस झाले आहेत. नुकतंच मुलगा गश्मीर महाजनीने (Gashmeer Mahajani) सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधत अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.

गश्मीरने इन्स्टाग्रामवर 'आस्क गश' हे सेशन घेतले. यावेळी चाहत्यांनी त्याला या कसा आहेस? या कठीण प्रसंगाला कसं सामोरं जात आहेस? परत काम कधी सुरु करणार? असे अनेक प्रश्न विचारले. तर एका चाहत्याने प्रश्न केला की,' या कठीण प्रसंगात मराठी फिल्म इंडस्ट्रीतून कोणी साथ दिली का? यावर गश्मीर म्हणाला, 'हो...काही अतिशय कुशल लोकांनी मला फोन केला आणि पाठिंबा दिला. विशेषत: प्रविण तरडे, रितेश देशमुख, मृण्मयी देशपांडे..हे लोक तर रत्न आहेत आणि मी त्यांचे ऋण कधीच विसरणार नाही.

गश्मीर पुढे म्हणाला, 'माझे मित्र अक्षय आणि श्रीकर माझी ताकद होते. तसंच प्रविण तरडे आणि रमेश परदेशी माझं कुटुंबच आहेत. ते खांबासारखे माझ्यामागे उभे राहिले.'

गश्मीर सध्या कुटुंबाची काळजी घेत आहे. आईच्या तब्येतीकडे लक्ष देत आहे. गश्मीरची आई अद्याप या धक्क्यातून सावरलेली नाही. म्हणून सध्या तो आईला पूर्ण वेळ देत आहे. रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर गश्मीरला प्रचंड ट्रोल केले गेले. मात्र ट्रोलर्सकडे लक्ष देत नाही असंही त्याने म्हटलंय.

टॅग्स :गश्मिर महाजनीप्रवीण तरडेरितेश देशमुखमृण्मयी देशपांडेरवींद्र महाजनीमराठी अभिनेता