अभिनेता गश्मीर महाजनीला (Gashmeer Mahajani) 'देऊळ बंद' सिनेमामुळे खूप लोकप्रियता मिळाली. तसंच नुकताच त्याचा 'फुलवंती' गाजला. गश्मीर अतिशय चोखंदळपणे सिनेमे निवडतो त्यामुळे तो मोजक्याच सिनेमांमध्ये दिसतो. त्याने खरंतर २०१० साली हिंदी सिनेमातून अभिनयाला सुरूवात केली होती. 'मुस्कुराके देख जरा' असं सिनेमाचं नाव होतं. मात्र नंतर तो हिंदी वेबसीरिज, मालिकांमध्ये दिसला. पण सिनेमात आलाच नाही. आता नुकताच तो इतक्या वर्षांनी 'छोरी २'या हिंदी सिनेमात झळकला. हिंदीत कमबॅक करायला इतकी वर्ष का लागली याचं उत्तर त्याने दिलं आहे.
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत गश्मीर महाजनी म्हणाला, "हिंदी सिनेमांसाठी बोलवलं जातं पण मी एक दोन वेळा फसलो.सिनेमा जसा बनेल वाटत होतं तसा बनला नाही.किंवा जो रोल मला ऐकवला होता तसा नंतर तो मला वाटला नाही. त्यामागे बरीच कारणं असतील मी काही तक्रार करत नाहीए. त्यामुळे आता मी आधी संहिता बघतो आणि माणूस कोण आहे बघतो. दिग्दर्शक कोण आहे, निर्माता कोण आहे हे पाहतो. दिग्दर्शकासोबत माझं ट्युनिंग जुळतंय का, तो जे सांगतोय तसंच घडणार आहे असा मला विश्वास बसला तरच मी होकार देतो. नाहीतर मी सिनेमा करत नाही."
तो पुढे म्हणाला, "हे असंच वेब शो, मालिका, हिंदी असो किंवा मराठी सिनेमकरता ही आहे. आता फिल्टर्स लागत चाललेत त्यामुळे मापक काम होतंय. मी मुद्दामून कमी काम करतोय असं नाहीए. माणूस महत्वाचा वाटत चाललाय. तो माणूस प्रोजेक्ट पूर्णत्वाला नेईल का असं वाटलं तर मी करतो. साहजिकच आपण अनुभवातून शिकतो. माझ्या काही चुका झाल्या. काही चुकीच्या भूमिका घेतल्या नंतर कळलं त्या तशा नव्हत्या. काम करण्याची मजा आली पाहिजे नाहीतर या प्रोफेशन मध्ये येण्याचा फायदाच काय."