प्रेम या संकल्पनेवर आजवर अनेक चित्रपट आले आहेत, आणि पुढे देखील ती येत राहतील. मात्र, प्रेम सुरु होण्याआधीचा प्रवास 'गॅट मॅट' या चित्रपटातून घडून येणार आहे. शुक्रवारपासून सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाच्या 'गॅट मॅट' या शीर्षकावरूनच याचा अंदाज बांधता येऊ शकतो. प्रेमकथेची सुरुवात होण्याआधी, दोघांपैकी एकाला प्रेमाची कबुली ही द्यावीच लागते. मात्र काही जणांना ते जमत नाही. अशावेळी, मित्राच्या मदतीने 'गॅट मॅट' जुळवून दिले जाते. लव्हस्टोरीच्या आधी सुरु असलेल्या या भानगडीची मज्जाच काही न्यारी असते !. खास करून कॉलेज विश्वात प्रत्येकांनी कोणाचे तरी 'गॅट मॅट' हे जुळवून दिलेले असतेच. अशा या 'गॅट मॅट' च्या भन्नाट किस्स्यांचा आस्वाद निशीथ श्रीवास्तव दिग्दर्शित 'गॅट मॅट' या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना घेता येणार आहे. अवधूत गुप्ते प्रस्तुत आणि यशराज इंडस्ट्रीज यांची निर्मिती असलेला हा सिनेमा महाविद्यालयीन जीवनावर आधारित असल्याकारणामुळे, तरुणवर्गासाठी तो खास ठरणार आहे. विशेष म्हणजे दिवाळसणाच्या धामधूमीनंतर उरलेल्या सुट्टीचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी, मित्रपरीवारांसोबत हा सिनेमा पहावयास जाण्यास काही हरकत नाही. तसेच राजेंद्र प्रसाद श्रीवास्तव यांनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे .
कॉलेज विश्व म्हटले कि, मित्रांबरोबरच्या कट्टागप्पा या आल्याच ! याच कट्ट्यावर अनेकांचे प्रेम जुळतात, आणि मोडतात देखील. अशा या प्रत्येक कॉलेजच्या कट्ट्यांवर घडणारी धम्माल 'गॅट मॅट' या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. शिवाय या सिनेमात अक्षय टंकसाळे, निखील वैरागर, रसिका सुनील आणि पूर्णिमा डे हे नव्या दमाचे आणि यशस्वी कलाकार पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, छोट्या पडद्यावरील मालिकेतून नावारूपास आलेली रसिका सुनील बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा 'गॅट मॅट'द्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या अभिनेत्रीला पाहण्यासाठी तिचे चाहतेदेखील उत्सुक झाले असतील हे निश्चित. याव्यतिरिक्त या सिनेमातील गाणी देखील बहारदार आहेत.
कॉलेज तरुणाईला आपलंसं करणार अवधूत गुप्ते याच्या आवाजातील 'गॅट मॅट' सिनेमाचे शीर्षक गीत असो, वा सिनेमातील सुप्रसिद्ध हिंदी रॅपर बाबा सेहगल आणि जुईली जोगळेकरने गायलेले
'एक पेग दोन पेग' हे धम्माल पार्टी साँग असो, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना लाभला आहे. तसेच, वरातीत गाजवणार आनंद शिंदे यांच्या आवाजातील धम्माल गाणं देखील या सिनेमात आहे. समीर साप्तीस्करने संगीतदिग्दर्शन केलेली या सिनेमातील सर्वच गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे.
तरुणाईने बहरलेल्या या सिनेमाची कथा अभिनेता निखील वैरागरनेच लिहिली आहे. तसेच या सिनेमाचे संवादलेखन रोहन पेडणेकरने केले आहे. युवापिढीची रोमेंटिक दुनिया सादर करणाऱ्या या सिनेमामध्ये पलक गंगेले हि ग्लॅम अभिनेत्रीदेखील झळकणार आहे. शिवाय शेखर बेटकर, संजय खापरे, अतुल तोडणकर, उदय टिकेकर,शिवराज वाळवेकर,प्रमोद पुजारी या कलाकारांचीदेखील यात भूमिका आहे. प्रेमात पडणाऱ्या सर्वांना आपलंसं करणाऱ्या या सिनेमाबरोबर 'गॅट मॅट' करण्यासाठी, सिनेप्रेक्षकदेखील सज्ज झाली असतील यात शंका नाही.