बंगळुरुमधील एका मॉलमध्ये धोतर नेसलेल्या एका वृद्ध व्यक्तीला प्रवेश नाकारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. जीटी मॉलमध्ये १६ जुलै रोजी ही घटना घडली. आपल्या मुलासोबत सिनेमासाठी गेलेल्या वृद्ध व्यक्ती प्रवेशद्वारावरच अडवण्यात आलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अभिनेत्री गौहर खान हिनं या घटनेवर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
गौहर खानने इन्स्टाग्रामवर घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक आजोबा धोतर नेसलेले आजोबा मॉलच्या बाहेर उभे असल्याचं दिसून येत आहे. गौहर खान हिनं कॅप्शनमध्ये लिहलं, 'हे अत्यंत लज्जास्पद आहे! मॉलवर कठोर कारवाई झालीच पाहिजे! हा भारत देश आहे आणि आपल्या सर्वांना आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटला पाहिजे'.
फकीरप्पा असं या वृद्ध व्यक्तींचं नाव आहे. ते आपल्या मुलासोबत मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी आले होते. त्याच्याकडे प्री-बुक केलेली चित्रपटाची तिकिटेही होती. पण तरीही प्रवेशद्वारावरच मॉलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांची अडवणूक केली. सुरक्षा रक्षकांनी त्यांना कपडे बदलून पँट घालून येण्यास सांगण्यात आलं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मॉलच्या कर्मचाऱ्यांवर खूप टीका केली.
दरम्यान, हे प्रकरण जास्तच चर्चेत आल्यानंतर मॉलच्या कर्मचाऱ्यांनी या वृद्धाची माफी मागत त्यांचा सन्मान केला. मात्र प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. त्यानंतर कर्नाटक सरकारने मॉल प्रशासनाला दणका दिलाय. 7 दिवस मॉल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. धोतर हा पोशाखाचा अविभाज्य भाग आहे. भारतीय संस्कृतीमध्ये या पोशाखाला वेगळं महत्त्व आहे. अनेक नेते,मंत्री हेही संसदेत धोतरवर आल्याचं देशानं पाहिलंय.