Join us

मुंबईत कार्यक्रम करताना सुरक्षित वाटतं का? गौतमी पाटीलने दिलं थेट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2023 11:38 AM

Gautami patil: पहिल्यांदाच दहीहंडीच्या निमित्ताने गौतमीने मुंबईमध्ये  लावणीचे दोन कार्यक्रम केले.

'सबसे कातील' असं म्हटलं की अनेकांच्या तोंडावर आपोआप गौतमी पाटील (gautami patil) हिचं नाव येतं. आजवर गौतमीने पुणे, मराठवाडा, विदर्भ अशा अनेक ठिकाणी लावण्यांचे कार्यक्रम केले. मात्र, पहिल्यांदाच दहीहंडीच्या निमित्ताने तिने मुंबईमध्ये  लावणीचे दोन कार्यक्रम केले. विशेष म्हणजे मुंबईमध्येही तिला दरवेळेसारखा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे एका माध्यमाशी बोलत असताना तिने मुंबईकरांविषयी तिचं मत व्यक्त केलं. यात मुंबईत आल्यावर सुरक्षित वाटतं की नाही हे सुद्धा तिने सांगितलं.

गौतमीचा कार्यक्रम म्हटलं प्रचंड गर्दी ठरलेली आहे. यात अनेकदा तिच्या कार्यक्रमात हाणामारीदेखील झाली आहे. त्यामुळे मुंबईत तिच्या कार्यक्रमाचं आयोजन केल्यानंतर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. विशेष म्हणजे याविषयी गौतमीने मुंबईच्या सुरक्षेविषयी भाष्य केलं आहे.

"मी बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमांना जाते. सगळ्याचं प्रेम मिळतं. मुंबईतही मला तितकंच प्रेम मिळालं. हे पाहून मला खूप आनंद झाला. आज मुंबईला येऊन मुंबईच्या लोकांचं प्रेम पाहून खूप छान वाटलं.  तुम्ही मला बोलवा मी मुंबईत नक्की कार्यक्रम करेन", असं गौतमी म्हणाली.  यावरच तिला एक प्रश्न विचारण्यात आला. 

'मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी तुझ्या कार्यक्रमात हाणामारी, गर्दी झाली त्यामुळे मुंबईत येऊन परफॉर्म करताना सुरक्षित वाटतं का?' असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. त्यावर, "हो. मला मुंबईत सुरक्षित वाटतं. इतक ठिकाणीही मी कार्यक्रम करते त्यावेळी मला सुरक्षित वाटतं. कारण, कार्यक्रमाचे आयोजक सगळ्याचं व्यवस्थित नियोजन करतात. त्यामुळे सगळीकडेच मी सुरक्षित आहे." 

टॅग्स :गौतमी पाटीलसेलिब्रिटीमुंबई