Join us

'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 10:50 IST

रितेश आणि जिनिलिया यांना रियान आणि राहील अशी दोन मुलं आहेत.

चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, जे त्यांचं काम जितकं चोख बाजवतात. तितकेच चोख ते इतर जबाबदाऱ्या पार पाडण्यात सुद्धा असतात. असाच एक जबाबदार अभिनेता आणि वडील म्हणजे (Riteish Deshmukh ) रितेश देशमुख. आपलं काम, वडील आणि एक पती म्हणून असलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या रितेशने वेळोवेळी पूर्ण केल्या आहेत. त्याच्या पत्नीने म्हणजे जिनिलियाने (Genelia Deshmukh) 'फादर्स डे' निमित्त त्याच्याकरता एक खास पोस्ट लिहिली आहे.  

रितेश आणि जिनिलिया यांना रियान आणि राहील अशी दोन मुलं आहेत. जिनिलीयाने एक खास पोस्ट शेअर करत रितेशला 'फादर्स डे' निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. जिनिलियाने रितेश आणि मुलांचे फोटो शेअर केले आहेत. यासोबत तिनं लिहलं, 'जेव्हा मी या फोटोंकडे पाहते. तेव्हा मला असं वाटतं की, हे फोटो किती परिपूर्ण आहेत. तुम्ही तिघे एकमेकांसाठी इतके जास्त परिपूर्ण आहात, यामध्ये माझ्यासह इतर कोणालाही जागा नाहीये.  प्रेम ज्याला मर्यादा नसतात असं आपण नेहमी वाचतो पण, तुमच्याकडे पाहून ते सिद्ध होतं'.

तिने पुढे लिहलं, 'रियान, राहिलचे बाबा रितेश देशमुख… तुम्ही आपल्या मुलांना लाभलेलं खूप मोठं आणि सुंदर गिफ्ट आहात. त्यांच्या मदतीसाठी कायम तत्पर राहिल्याबद्दल खूप खूप आभार, असं जिनिलियानं लिहलं. तिच्या या पोस्टवर रितेश देशमुखने कमेंट करत म्हटलं, 'आय लव्ह यू बायको…पण, तुझ्याशिवाय आम्ही तिघंही अपूर्ण आहोत. तू आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहेस'. यावर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

रितेश देशमुख आणि जिनिलिया हे सर्वांचं आवडतं जोडपं आहे.  ऑनस्क्रीनवर एकत्र झळकणाऱ्या या जोडीची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीदेखील चाहत्यांना विशेष आवडते. रितेश देशमुखचं जिनिलियावर जीवापाड प्रेम आहे. हे अनेकदा दिसून आलं आहे. आता जिनिलियाने शेअर केलेल्या या पोस्टमुळे रितेश एक वडील म्हणून किती उत्तम आहे याचीसुद्धा जाणीव होत आहे.

टॅग्स :जेनेलिया डिसूजासेलिब्रिटीरितेश देशमुखजागतिक पितृदिनसोशल मीडिया