'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे. महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) 'बिग बॉस मराठी'(Bigg Boss Marathi Season 5)च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी उत्तमरित्या पेलताना दिसत आहे. नॉन फिक्शनमध्ये बिग बॉसने मराठी भाऊच्या धक्क्याचा चांगलाच बोलबाला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाने रेकॉर्डब्रेक TVR मिळवत नवा विक्रम रचला आहे. आपल्या लाडक्या नवऱ्याची ही कामगिरी पाहून जिनिलिया हिने रितेशचं कौतुक केलं आहे.
मराठी मनोरंजनाचा बॉस असणाऱ्या 'बिग बॉस मराठी' या कार्यक्रमाच्या 'भाऊच्या धक्क्या'ने या आठवड्यात 4.4 TVR मिळवत सर्वच रेकॉर्ड्स ब्रेक केले आहेत. गणपती वीकेंड स्पेशल भाऊच्या धक्क्याला 4.4 रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात 'बिग बॉस मराठी'ची धूम असल्याचं चित्र स्पष्ट होतं. इतर वाहिन्यांवरील नॉन फिक्शन कार्यक्रमांना 'बिग बॉस मराठी'ने मागे टाकलं आहे.
जिनिलिया हिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यात तिने रितेशचं कौतुक केलं आहे. तिने लिहलं, "दर आठवड्याला Trp चांगला होत जातोय. तु फक्त रेकॉर्ड मोडत नाही आहेस तर तु आता नवीन रेकॉर्ड बनवत आहेस. यासाठी रितेश, केदार शिंदे, कलर्स मराठी आणि बिग बॉस आणि BB मराठी प्रेक्षकांचे अभिनंदन मराठी". जिनिलियाची ही स्टोरी रितेशनेही शेअर करत आनंद व्यक्त केला.
दरम्यान, हा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार, अशा चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावर हा शो तीन महिने पूर्ण होण्याआधीच बंद होणार, अशी चर्चा रंगली आहे. नुकतंच बिग बॉसच्या घरात पत्रकार परिषद झाली. साधारणपणे बिग बॉसचा फिनाले जवळ आला की पत्रकार परिषद घेतली जाते. त्यामुळे हा शो इतक्या लवकर संपणार का? असं प्रेक्षक विचारत आहेत. शिवाय, बिग बॉस हिंदीचे १८ वे पर्व ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे, त्यामुळे बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व लवकर संपेल, अशीही चर्चा आहे.