Join us

गर्ल्स आॅन टॉप

By admin | Published: May 11, 2016 1:57 AM

तेजश्री प्रधान, हेमांगी कवी, अमृता सुभाष, उषा जाधव अशा एकापाठोपाठ एक मराठी तारका बॉलिवूडमध्ये झळकणार असल्याचे चित्र यंदाच्या वर्षी पाहायला मिळणार आहे.

परीक्षा कोणतीही असो पण प्रत्येक वेळी मुलींनी बाजी मारल्याचे वाक्य सतत कानावर पडत असते. असेच काहीसे चित्र सध्या मराठी इंडस्ट्रीत पाहायला मिळत आहे. तेजश्री प्रधान, हेमांगी कवी, अमृता सुभाष, उषा जाधव अशा एकापाठोपाठ एक मराठी तारका बॉलिवूडमध्ये झळकणार असल्याचे चित्र यंदाच्या वर्षी पाहायला मिळणार आहे. मराठी अभिनेत्यांच्या तुलनेत मराठी तारकांनी बॉलिवूडमध्ये बाजी मारल्याचे दिसत आहे. एकीकडे बॉलिवूड कलाकारांची मराठी इंडस्ट्रीकडे रांग लागली असताना, दुसरीकडे मराठी अभिनेत्री बॉलिवूडमध्ये दमदार पाऊल टाकताना दिसत आहे. तेही रामगोपाल वर्मा, सतीश कौशिक, अनुराग कश्यप, अजय वर्मा यांसारख्या बॉलिवूडच्या तगड्या दिग्दर्शकांसोबत काम करताना पाहायला मिळणार आहे. यंदा मराठी तारकांचे हे यश म्हणजे मराठी इंडस्ट्रीला मिळालेली यशाची पावती आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.अमृता सुभाष : बॉलीवूडचा तगडा दिग्दर्शक अनुराग कश्यप दिग्दर्शित रामन राघव (फफ 2.0) या बॉलीवूड चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष झळकणार आहे. यामध्ये ती अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीसोबत पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचा प्रीमिअर कान्स २०१६ फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणर आहे. नीतेश छाब्रा खूप मोठे कास्टिंग डायरेक्टर आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांची इंडस्ट्रीत ओळख होती. त्यांच्याकडे एका जाहिरातीच्या टेस्टसाठी गेले होते. ती टेस्टदेखील चांगली झाली होती आणि नेमकी त्याचवेळी योगायोगाने अनुराग कश्यप यांनी नीतेशला एका चित्रपटासाठी हीरोईन पाहिजे असल्याचे सांगितले. त्या वेळी नीतेशने माझी ती टेस्ट त्यांना दाखविली आणि माझी या बॉलिवूड चित्रपटासाठी निवड झाली, असे अमृता सुभाषने ‘लोकमत सीएनएक्स’ला सांगितले. अमृता म्हणाली, अनुराग व नवाजुद्दिनसोबत काम करताना खूप छान अनुभव मिळाला. हा चित्रपट माझ्यासाठी एक पर्वणीच ठरला आहे. कारण मराठी नसलेल्या प्रेक्षकांपर्यंत माझे काम पोहोचणार असून, बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज लोकही माझे काम पाहतील, याचा मला जास्त आनंद आहे.हेमांगी कवी : ‘ती फुलराणी’ या नाटकामधून सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी हेमांगी कवीदेखील ‘स्कूल चलेंगा’ या बॉलीवूड चित्रपटात झळकणार आहे. बॉलीवूडला ‘तेरे नाम’, ‘क्योंकी’ असे सुपरहिट चित्रपट देणारे दिग्गज दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा हा चित्रपट आहे. याविषयी ‘लोकमत सीएनएक्स’शी बोलताना हेमांगी म्हणाली, ‘स्कूल चलेंगा’ या हिंदी चित्रपटात काम करताना भाषा वगळता वेगळं असं काही जाणवलं नाही. बॉलिवूड चित्रपट इकॉनॉमी स्ट्राँग असल्यामुळे ते जास्त फोकस वाटतात. या इंडस्ट्रीमध्ये पेपरवर्क खूप आधी करून घेत असल्यामुळे त्यावर काही अडचण येत नाही. आपल्याकडे फायनान्शियल प्रॉब्लेम असल्यामुळे आयत्या वेळी निर्णय घेतला जातो. पण क्रिएटिव्हिटीच्या दृष्टीने मराठी इंडस्ट्री खूप पुढे असल्याचे जाणवले. तसेच सतीश कौशिक खूप पॉझिटिव्ह व्यक्तिमत्त्व आहे, तेदेखील थिएटरमधील आहे. त्याच्यासोबत बोलताना एक प्रकारची आपुलकी निर्माण झाली. त्यांना मराठी कलाकारांविषयी प्रचंड आदर आहे. मी जेव्हा त्यांना सांगितले, ती फुलराणी हे नाटक करते त्या वेळी त्यांचा चेहरा बघण्यासारखा होता. ते म्हणाले, व्वा क्या बात है! तीस वर्षे झाली तरी हे नाटक चालू आहे. याचा त्यांना फार आनंद झाला.तेजश्री प्रधान : ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून महाराष्ट्राची लाडकी सून जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान ही महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात पोहोचलेली आहे. नुकतीच तिची मालिका संपल्यानंतर तिचे चाहते तिला पुन्हा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पण तिच्या चाहत्यांना एक खूशखबर आहे, जान्हवी म्हणजेच सर्वांची लाडकी तेजश्री ही हिंदी नाटकांसह बॉलीवूडमध्येदेखील पदार्पण करीत आहे. बॉलिवूडचा तगडा अभिनेता शर्मन जोशीसोबत ‘मै और तुम’ या नव्या हिंदी नाटकामध्ये ती झळकणार आहे. त्याचबरोबर ती ‘सायोनारा-फिर मिलेंगे’ या नव्या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. या चित्रपटात तेजश्रीसोबत अतुल कुलकर्णी, शर्मन जोशी आदी कलाकार पाहायला मिळणार आहेत. अजय वर्मा दिग्दर्शित हा चित्रपट आहे. उषा जाधव : मराठी चित्रपटसृष्टीत राष्ट्रीय पुरस्कार पटकविणारी अभिनेत्री उषा जाधव ही यापूर्वीदेखील मधुर भांडारकर यांच्या ‘टॅ्रफिक सिग्नल’ या वास्तव सुपरहिट चित्रपटात झळकली होती. यासोबतच ती अनेक बॉलिवूड चित्रपटांतदेखील पाहायला मिळाली. मराठी इंडस्ट्रीची ही सुंदर अभिनेत्री आता, रामगोपाल वर्मा दिग्दर्शित ‘वीरप्पन’ या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट चंदनतस्कर वीरप्पनच्या जीवनपटावर आधारित आहे. या चित्रपटात उषा वीरप्पनच्या पत्नीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. याविषयी ‘लोकमत सीएनएक्स’शी बोलताना उषा जाधव म्हणाली, रामगोपाल वर्मा यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव खूप छान होता. खूप काही नवीन गोष्टी शिकावयास मिळाल्या. बॉलीवूडच्या तुलनेत मराठी चित्रपट हा राज्यापुरताच मर्यादित असल्यामुळे लिमिटेड प्रेक्षक असतात. त्या तुलनेत बॉलीवूडच्या चित्रपटाच्या माध्यमातून जगभरात सर्व स्तराच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते.