मराठी सिनेविश्वातील चंद्रमुखी म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar). जिने आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याने रसिकांना भुरळ घातली आहे. तिने मराठीसह हिंदीत काम केले आहे. विविधांगी भूमिका साकारुन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. अमृताचा फॅन फॉलोव्हिंगदेखील खूप आहे. त्यांना तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. नुकतेच अभिनेत्री अमृता खानविलकरने लोकमत सखीला दिलेल्या मुलाखतीत महिलांना मोलाचा सल्ला दिला आहे.
अमृता खानविलकर म्हणाली की, मला असं वाटतं आर्थिक स्वावलंबन एक गोष्ट आहे आणि भावनिक स्वावलंबन एक गोष्ट आहे या दोन्ही गोष्टींमध्ये ना मुलींनी त्या-त्या गोष्टींवर काम केलं पाहिजे. आता भावनिक स्वावलंबन होणं म्हणजे काय आहे तर मी असं नाही म्हणत आहे की, तुम्ही तुमच्या नवऱ्यावर प्रेम करू नका, तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करू नका, आई-वडिलांवर प्रेम करू नका, त्यांची काळजी घेऊ नका. एकदम भावनिकदृष्ट्या अलिप्त व्हा. नाही पण जर त्यांचं तुमच्यामुळे अडत नाही ना तर तुमचं सुद्धा त्यांच्यामुळे अडायला नाही पाहिजे. या सगळ्या मंडळीच नाही पण कोणामुळेही तुमचं अडायला नाही पाहिजे, असं खूप होतं. अशा खूप टप्पे येतात आयुष्यामध्ये. जेव्हा तुम्हाला खूप एकटे वाटते किंवा घर भरलेलं जरी असेल तरीसुद्धा तुम्ही खूप एकटे वाटते. त्या भावनेवर तुम्ही काम करायला पाहिजे.
अमृता पुढे म्हणाली की, मलासुद्धा हे शिकवलं गेलेलं नव्हतं की भावनिक स्वावलंबन होणं म्हणजे काय आहे तर एखादी गोष्ट ज्या गोष्टी बाबतीत तुम्हाला भीती वाटतं ती करून तर बघा. काय होईल एकदा चुकाल दुसऱ्यांदा चुकाल, तिसऱ्यांदा चुकाल. चौथ्यांदा तुम्ही ओके असाल. तुम्हाला कळेल अगदी किंवा आपण म्हणतो ना की इकडे नाही मी एकटी कशी राहू यार, मी इकडे एकटी कशी जाऊ. जाऊन बघा. ती गाडी चालवून बघा, नाही फोर व्हिलर आहे कशी काय मी ठोकली. ठीक आहे एकदा तुम्ही ठोकली गाडी किंवा त्याला स्क्रॅचचं आलं. एकदा होईल, दुसऱ्यांदा होईल, तिसऱ्यांदा नाही होणार. करून बघा तुम्ही जोपर्यंत ते करून बघत नाही ना मला असं वाटतं की तुम्हाला त्याचा अनुभव येत नाही. चुकणार आपण सगळेच आहोत.