Join us

ग्लॅमर, पैशासाठी नव्हे; अभिनयावर प्रेम असेल तरच चित्रपटात या- राणी मुखर्जी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 1:45 AM

बॉलिवूड हे पुरुषी वर्चस्वाचे क्षेत्र मानले जात असले, तरी मी सर्वांवर डॉमिनेट करते, अशी मिश्किल टिप्पणी तिने केली.

पुणे : चित्रपट क्षेत्रात अनेक मुली ग्लॅमर, पैसा आणि विविध देशांमध्ये प्रवेश करायला मिळेल यासाठी येतात; पण अभिनय आणि कलेवरच्या प्रेमापोटी इथे आलात तर काही तरी करण्याची संधी मिळेल, अशा शब्दातं ‘खंडाळा गर्ल’ अभिनेत्री राणी मुखर्जी हिने बॉलिवूडमध्ये ‘एंट्री’ करू इच्छिणाऱ्या नवोदित कलाकारांना कानमंत्र दिला. बॉलिवूड हे पुरुषी वर्चस्वाचे क्षेत्र मानले जात असले, तरी मी सर्वांवर डॉमिनेट करते, अशी मिश्किल टिप्पणी तिने केली.काही वर्षांपूर्वी राणी मुखर्जी ‘अय्या’ चित्रपटासाठी पुण्यात शूटिंगकरिता आली होती आणि पक्की पुणेकर बनली. इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकदा लोकमतर्फे आयोजित ‘वुमन समीट’ सोहळ्यानिमित्त तिचा मुंबई-पुणे-मुंबई प्रवास घडला. या वेळी ऋचा अनिरुद्ध आणि लोकमत समूहाचे चेअरमन विजय दर्डा यांनी तिच्याशी साधलेल्या संवादातून एक अभिनेत्री, आई अशा ‘स्त्रीत्वाच्या’ तिच्या भूमिकांचा पट उलगडला.शिक्षणव्यवस्था आणि शिक्षकांची विद्यार्थ्यांकडे पाहण्याची दृष्टी यावर भाष्य करणारा ‘हिचकी’ हा देशभरातील रसिकांच्या पसंतीस उतरलेला चित्रपट नुकताच चीनमध्ये प्रदर्शित झाला आणि त्याने १०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला. विशेष म्हणजे, हा मातृत्वानंतरचा तिचा पहिलाच चित्रपट. या चित्रपटाचा अनुभव तिने मांडला. हा माझ्यासाठी खूप खास असाच चित्रपट होता. एकदा पोहायचे कसे हे माहीत असले, की चार वर्षांनंतरही पोहता येतेच. चित्रपटापासून दूर होते; पण अभिनय करणे विसरले नाही. मला आठवतंय, ‘हिचकी’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला जाताना पहिल्या दिवशी कारमध्ये बसून खूपच रडत होते. कारण माझ्या १४ महिन्यांच्या मुलीला घरी सोडून बाहेर पडले होते. मातृत्वामध्ये शरीरात अनेक हार्मोनल बदल झालेले असतात. वास्तवातील भूमिका आणि प्राधान्यक्रम बदलेले असतात. महिलांना कुटुंब आणि काम यांचा समतोल सांभाळा लागतो. त्यामुळे थोडी स्थिरस्थावर झाल्यानंतर शूटिंग करणे सोपे झाले. तो काळ खूप कठीण होता. मात्र, कुटुंबाकडून खूप चांगला पाठिंबा मिळाला. प्रेक्षकांनी माझे मातृत्व आणि वेगळा विषय म्हणून चित्रपटाला उचलून धरले. चीनमधील चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळाला. चायनिज लोक चित्रपट पाहून रडत असल्याचा अनुभव घेतला. चित्रपटाला भाषा आणि प्रांत यांची बंधने नसतात. हे यातून पाहायला मिळाले.’’चित्रपट क्षेत्रात २५ वर्षे काम केले. इतक्या वर्षांचा अनुभवातून हा प्रवास अधिकच प्रगल्भ बनत गेला. प्रत्येक दिवस नवे काहीतरी शिकवणारा असतो. आपण शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे. चित्रपटसृष्टीत हे महत्त्वाचे असते. प्रत्येक भूमिका स्वत:मध्ये बदल घडवत असते; त्यामुळे व्यक्तिमत्त्वही बदलते. आज वयाच्या चाळिशीच्या उंबरठ्यावर असले तरी २१ वर्षांचीच असल्यासारखीच विचार करते. प्रेक्षकांना काय वेगळ पाहायला आवडेल तेच भूमिकेमधून उभे करण्याचा प्रयत्न करते.... मला अभिनेत्री व्हायची इच्छा नव्हती. या क्षेत्रात अपघातानेच आले. मी या क्षेत्रात यावे, असे आईला वाटत होते. कोणतीही संधी एकदाच आपल्या दारात येते.ती ओळखायला शिकले पाहिजे. मी तिचे ऐकले आणि इथपर्यंत पोहोचले. हे मिळवायचेच आहे, अशी इच्छा नव्हती. त्यामुळे प्रवासातील प्रत्येक टप्पा मी एन्जॉय केला... हा तिचा प्रवास ऐकताना महिला भारावून गेल्या होत्या. चित्रपट हे मनोरंजनाचे माध्यम आहे. कोणताही सामाजिक संदेश मनोरंजनाच्या माध्यमातून चित्रपटांमध्ये दिला तर तो प्रेक्षकांपर्यंत सहजपणे पोहोचतो, याकडेही तिने लक्ष वेधले. 

टॅग्स :मीटूराणी मुखर्जीलोकमत विमेन समिट २०१८