‘ट्यूबलाइट’चे अपयश विसरून बॉलिवूडचा दबंग सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाला आहे. शूटिंगचे काही फोटोज सातत्याने समोर येत असून, यामध्ये सल्लूमियाँचा अंदाज घायाळ करणारा आहे. सध्या सलमान मोरोक्को येथे चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यासाठी ठाण मांडून बसला आहे. याचदरम्यान सेटवरील काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्येही सलमान ‘ट्यूबलाइट’ चित्रपटाप्रमाणेच पाठ दाखवून उभा आहे. हा फोटो बघून त्याच्या चाहत्यांकडून सलमानने एकदा पलटून झलक दाखवावी, असा आग्रह केला नाही तरच नवल. या फोटोचे वैशिष्ट्य म्हणजे सलमानच्या गळ्यात त्याचा लकी अफगाणी स्कार्फ दिसत आहे. यावरून हे स्पष्ट होते की, सलमान पुन्हा एकदा या चित्रपटात त्याच्या जुन्या टायगरच्या लूकमध्ये बघावयास मिळणार आहे. सलमानचे हे फोटोज दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी पोस्ट केले आहे. शिवाय, कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जो कोणी हे फोटो बघेल, तो हेच म्हणेल... प्लीज एकदा तरी पलट ना!’ या चित्रपटासाठी सलमान प्रचंड मेहनत घेत असून, त्याने तब्बल १७ किलो वजन कमी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सलमान फिट बॉडीमध्ये बघावयास मिळणार आहे.
सल्लूमियाँच्या कॅरेक्टरची अशीही झलक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 6:02 AM