Join us  

प्रासंगिक विनोदाचा 'बाय गो बाय'

By admin | Published: November 19, 2015 4:38 AM

दिग्दर्शक म्हणून ‘बाय गो बाय‘ हा माझा पहिला चित्रपट असला, तरी यापूर्वी सहायक दिग्दर्शन केलं आहे. तो अनुभव गाठीशी होता. तांत्रिकदृष्ट्या पूर्वतयारी झालेली होती.

दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट प्रदर्शित होत असताना काय भावना आहेत? - दिग्दर्शक म्हणून ‘बाय गो बाय‘ हा माझा पहिला चित्रपट असला, तरी यापूर्वी सहायक दिग्दर्शन केलं आहे. तो अनुभव गाठीशी होता. तांत्रिकदृष्ट्या पूर्वतयारी झालेली होती. सुरेश देशमाने, परेश मांजरेकर, सलील अमृते यांच्यासारखी अनुभवी मंडळी सोबत असल्याने दडपण आलं नाही.निर्मिती सावंत, विजय पाटकर यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांसह काम करण्याचा अनुभव कसा होता?- फारच सुंदर अनुभव होता. निर्मितीताई आणि विजय पाटकर यांनी माझ्या कथेवर विश्वास दाखवला. माझा विचार पक्का असल्याने, त्यांनी प्रत्यक्ष कामातही खूप सहकार्य केले. त्यांच्यासह नयन जाधव, शशिकांत केरकर, जयवंत भालेकर, प्रशांत चौडप्पा हेही कलाकार तितकेच महत्त्वाचे आहेत. या सर्वांनीच मला हवं होतं तसंच काम केलं. महत्त्वाची बाब म्हणजे, निर्माते प्रदीप कचेर पाटील व नरेश गणपत ठाकूर यांनी कामात पूर्ण स्वातंत्र्य दिलं. त्यामुळे मोकळेपणाने काम करता आलं. इतर विनोदीपटांपेक्षा ‘बाय गो बाय’ वेगळा कसा?- ‘बाय गो बाय’ हा नेहमीच्या विनोदी चित्रपटांपेक्षा नक्कीच वेगळा आहे. प्रासंगिक विनोद हे या चित्रपटाचे बलस्थान आहे. महाराष्ट्रावर निर्मिती सावंत या नावाचं गारूड आहे. मात्र, त्यांची या चित्रपटातील भूमिका अत्यंत वेगळी आहे. या चित्रपटाची ठेवण वेगळी आहे, मांडणीची शैलीही वेगळी आहे. दाक्षिणात्य चित्रपटाप्रमाणे त्याची हाताळणी करण्यात आली आहे. पहिला चित्रपट दिग्दर्शित करताना फिल्म फेस्टिवल वगैरे डोळ्यासमोर ठेवले जातात. तुम्हाला तसा प्रयत्न करावासा नाही वाटला का?- मुळात, कलात्मक आणि व्यावसायिक अशी वर्गवारी करणेच आवडत नाही. कलात्मक चित्रपटांइतकेच व्यावसायिक चित्रपटासाठी कष्ट घ्यावे लागतात. त्यातूनही सामाजिक संदेश दिला जातो. ‘बाय गो बाय’ विनोदी चित्रपट असला, तरी त्यातही सामाजिक प्रश्न हाताळण्यात आला आहे. स्त्रियांना काय सहन करावे लागते, एखाद्या चुकीचे काय परिणाम होऊ शकतात, याचा थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार केला आहे. बदलत्या मराठी चित्रपटांविषयी काय सांगाल? - खूप चांगले बदल होत आहेत. आता मराठी आणि हिंदी चित्रपटांत फरक राहिलेला नाही. मराठी चित्रपट प्रत्येक बाजूवर सक्षम आहे, तसेच व्यापक स्तरावर प्रदर्शितही होत आहे. सगळ्याच अर्थाने मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत. मुलाखत : विजय पगारे, दिग्दर्शक