संजय दत्तच्या संजू या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना संजय दत्तच्या खाजगी आयुष्याविषयी जाणून घ्यायला मिळत आहे. संजय दत्तला ड्रग्सचे व्यसन लागले होते. तो या व्यसनातून कशाप्रकारे बाहेर आला हे आपल्याला चित्रपटात दाखवण्यात आले आहे. पण संजूप्रमाणेच आणखी काही बॉलिवूडमधील स्टारदेखील या ड्रग्सच्या विळख्यातून बाहेर आले आहेत. अभिनेता अमित संधला देखील लहानपणी ड्रग्सचे व्यसन जडले होते. तो या सगळ्यातून बाहेर कसा आला हे त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे.अमित संधने छोट्या पडद्यापासून त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली. क्यू होता है प्यार या त्याच्या पहिल्याच मालिकेतील त्याची आदित्य ही भूमिका चांगलीच गाजली होती. त्याने त्यानंतर अनेक मालिकांमध्ये काम केले. अमित बिग बॉस, फिअर फॅक्टर यांसारख्या रिअॅलिटी शो मध्ये देखील झळकला आहे. त्याने फुंक, काय पो छे, सरकार 3, सुलतान यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आता अमित गोल्ड या चित्रपटात हॉकी प्लेअर रघुवीर प्रताप सिंहच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितले, मी लहान असताना आमच्या घरची परिस्थिती अतिशय बेताची होती. मला लोकांच्या घराची भांडी देखील घासावी लागली आहेत. या सगळ्यातच मी अतिशय कमी वयातच दारू आणि ड्रग्सच्या अधीन गेलो. पण या सगळ्यातून मी कसातरी बाहेर पडलो. मी आज या सगळ्या गोष्टींपासून दूर आहे. आजवर मी खूप स्ट्रगल केले आहे... अभिनयक्षेत्रात आल्यावर या क्षेत्रात स्थिरावणे माझ्यासाठी खूपच कठीण होते. मी अभिनय क्षेत्रात येण्यासाठी अनेक वर्षं प्रयत्न केले. मला काही वर्षांनी एका मालिकेमध्ये काम मिळाले. या मालिकेतील माझे काम देखील लोकांना आवडले. त्यानंतर काहीच वर्षांत काय पो छे या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. पण या चित्रपटानंतर देखील दोन वर्षं मला काम मिळत नव्हते. घराचे भाडे द्यायला देखील त्या काळात माझ्याकडे पैसे नव्हते.
संजय दत्तप्रमाणेच हा अभिनेता देखील गेला होता ड्रग्सच्या अधीन, गोल्ड या चित्रपटात झळकणार महत्त्वाच्या भूमिकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 1:51 PM