अभिनेता सुबोध भावेचा २०११ साली रिलीज झालेल्या बालगंधर्व चित्रपटाला आज १० वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात बालगंधर्व यांची भूमिका सुबोधने साकारली होती. तर दिग्दर्शन रवी जाधवने केले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सुबोध भावेने या चित्रपटातील काही फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.
सुबोध भावे याने बालगंधर्व चित्रपटातील काही फोटो शेअर करत लिहिले की, "गंधर्वगाथा" हे भा.द.खेर लिखित पुस्तक पुस्तक वाचून सुरू झालेला प्रवास "बालगंधर्व" या चित्रपटाद्वारे संपन्न झाला. ६ मे २०११ रोजी या चित्रपटाचं प्रदर्शन झालं. आज बालगंधर्व चित्रपटाचा १० वा वाढदिवस.
सुबोधने पुढे म्हटले की, संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ आम्हाला प्रत्यक्ष बघता आला आणि काही काळाकरता का होईना प्रत्यक्ष जगता ही आला. त्या सर्वच कलाकारांनी केलेलं काम प्रचंड मोठं आहे,चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही त्यांना आणि त्यांच्या कामाला सलाम करू शकलो. झपाटल्यासारख काम करणं म्हणजे काय असतं ते या चित्रपटाच्या उत्तम टीम मुळे अनुभवास आलं. अनेक कडू गोड प्रसंग या चित्रपटाने वाट्यास आले पण आयुष्यभर लक्षात राहील तो कादंबरी वाचल्यापासून ते चित्रपट पूर्ण होईपर्यंतचा प्रवास. आणि या प्रवासातील आनंद हा अवर्णनीय आहे. ज्यांच्यामुळे हा चित्रपट करावासा वाटला त्या "बालगंधर्व" आणि त्यांच्या समकालीन सर्व दिग्गजांना मनापासून अभिवादन आणि ज्यांच्या बरोबर हा प्रवास केला त्या माझ्या अतिशय लाडक्या टीम वर मनापासून प्रेम.