Join us

‘गोलमाल’फेम अभिनेत्री मंजू सिंग यांचं हार्ट अटॅकने निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 12:54 PM

‘गोलमाल’ या चित्रपटासह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेल्या अभिनेत्री मंजू सिंग यांचं निधन झाले आहे.अभिनेत्री असण्यासोबतच त्या एक चांगल्या निर्मात्या देखील होत्या.

अमोल पालेकर यांच्या ‘गोलमाल’ या चित्रपटासह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेल्या अभिनेत्री मंजू सिंग यांचं निधन झाले आहे. त्या टीव्ही इंडस्ट्रीचा एक भागही होत्या. अभिनेत्री असण्यासोबतच त्या एक चांगल्या निर्मात्या देखील होत्या. त्यांनी अनेक चांगले शो तयार केले ज्यासाठी त्यांचे खूप कौतुकही झाले. गीतकार आणि अभिनेते स्वानंद किरकिरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही दु:खद बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे. रिपोर्टनुसार हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे मुंबईत निधन झाले.

स्वानंद किरकिरे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'मंजू सिंग जी आता राहिल्या नाहीत! दूरदर्शनसाठी स्वराज हा कार्यक्रम लिहिण्यासाठी मंजूजींनी मला दिल्लीहून मुंबईत आणले! डीडीसाठी त्यांनी 'एक कहानी', 'शो टाइम' इत्यादी अनेक अप्रतिम शो केले होते. हृषीकेश मुखर्जींच्या 'गोलमाल' चित्रपटातील रत्ना हमारी प्यारी मंजू जी, तुमचं प्रेम कसे विसरता येईल.. गुडबाय!'

 मंजू सिंग विशेषत: हृषिकेश मुखर्जी यांच्या १९७९ मध्ये आलेल्या ‘गोलमाल’ या चित्रपटासाठी ओळखल्या जात होत्या. या चित्रपटात त्यांनी रत्ना नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. याशिवाय त्या टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होत्या.

टॅग्स :स्वानंद किरकिरे