बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसणं हेच सर्वात मोठं नशिब मानलं जातं. मात्र, त्याच हॉट सीटवर बसून जेव्हा तुम्ही ५ कोटी रुपये कमावता, तेव्हा देशभर तुमच्या हुशारीची आणि बुद्धीमत्तेची चर्चा होते. स्वत: महानायक अमिताभ हेही तुमचं कौतुक करताना थकत नाहीत. बिहारमधील सुशील कुमार यांच्याबाबतीतही हेचं घडलं होतं. केसीबीच्या ०५ व्या पर्वात कौन बनेगा करोडपतीमध्ये ५ कोटी रुपये जिंकण्याचा पहिला मान सुशील कुमार यांना मिळाला होता. मात्र, काही वर्षानंतर त्यांच्याकडील ते पैसे संपून त्यांची परिस्थिती बिकट झाल्याचेही वृत्त माध्यमांत झळकले होते. आता, पुन्हा एकदा सुशील कुमार यांच्या कर्तृत्वाला नशिबाची साथ मिळाली आहे.
केबीसीमध्ये पाच कोटी रूपये जिंकणारा बिहारचा सुशील कुमार ४ वर्षांपूर्वी कंगाल झाल्याचे वृत्त माध्यमांत झळकले होते. केबीसी जिंकल्यानंतर त्याचे आयुष्य बदलले, पण लवकरच तो कंगाल झाला. सुशीलने फेसबुक पोस्टमध्ये केबीसी ५ जिंकल्यानंतर आपल्यावर आलेले प्रसंग आणि संघर्षाबाबत लिहिले होते. फेसबुक पोस्टमध्ये त्याने शीर्षक दिले की कौन बनेगा करोडपती जिंकल्यानंतर माझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट काळ, असे म्हणत त्याने आपणास मोठेपणा मिरवण्याचं व्यसन लागलं आणि दिल्लीत गेल्यानंतर दारु व सिगारेटचंही व्यसन लागल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे, त्यांच्यावर वाईट वेळ आल्याचं स्पष्ट झालं होत. मात्र, आता पुन्हा एकदा त्यांच्यासाठी चांगले दिवस आले आहेत.
बिहारमध्ये सरकारी शिक्षकासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत त्यांची निवड झाली आहे. बीपीएससी परिक्षेत त्यांनी राज्यात ११९ वा क्रमांक पटकावला. त्यामुळे, आता ते सरकारी शिक्षक म्हणून नोकरी करणार आहेत. केबीसीमध्ये सहभागी झाले तेव्हा सुशील कुमार मनरेगामध्ये कॉप्म्युटर ऑपरेटर होते. केबीसीनं त्यांना करोडपती केलं. मात्र, काही चुका झाल्या आणि त्यांच्याकडील सर्व पैसे संपले. मोठेपणा आणि कार्यक्रमांना हजेरी लावण्यात त्यांचा वेळ गेला, अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं. स्थानिक पातळीवर जे स्टारडम होतं, तेही हळूहळू कमी झालं. त्यामुळे, सुशील कुमार व्यथीत झाले होते. मात्र, त्यांनी हार मानली नाही. पर्यावरण संवर्धनाच्या कामात त्यांनी स्वत:ला झोकून दिलं. तसेच, बीपीएससी परीक्षेचा अभ्यासही जोमाने करुन लागले.
नुकतेच, पीएससी शिक्षक परिक्षेचा निकाल काल जाहीर झाला. त्यात इयत्ता सहावी ते आठवीसाठी त्यांना १६९२ क्रमांक मिळाला. तर १०+२ साठी त्यांना ११९ वा क्रमांक मिळाला. त्यामुळे, शिक्षक नोकरीसाठीच्या दोन्ही परीक्षेतून त्यांची निवड झाली आहे. सध्या, सरकारी नोकरीच्या दोन ऑफर्स त्यांच्याहाती आहे.