Join us

गुड बाय २०२३! छोट्या पडद्यावरील कलाकारांनी २०२३ वर्षातील आठवणींना दिला उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 1:44 PM

Good Bye 2023 : २०२३ चा निरोप देण्याची वेळ आली आहे, परंतु २०२३ ने दिलेल्या आठवणींसाठी छोट्या पडद्यावरील कलाकारांनी आभार मानले आहेत.

आपण २०२३ वर्षाच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहचलो आहोत. त्यामुळे सगळे जण नवीन वर्षाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. तसेच काही जण २०२३ वर्षातील चांगल्या-वाईट आठवणींना उजाळादेखील देत आहेत. छोट्या पडद्यावरील कलाकारांनी २०२३ वर्षातील आठवणींना उजाळा देत आभारही मानले आहेत. 

'तुला शिकवीन चांगलाच धडा' मधील अधिपती म्हणजेच ऋषिकेश शेलारने २०२३ ला निरोप देताना सांगितले की, २०२३ ने मला बेस्ट भेट दिली माझ्या मुलीच्या रूपात, १२ जानेवारी माझ्या घरी लक्ष्मीच्या आली. त्याचसोबत पहिल्यांदा मला नायकाची भूमिका साकारायची संधी मिळाली. २०२३ने मला हे शिकवलं की जर आपली स्वप्न पूर्णकारण्यासाठी मेहनत घेतली आणि त्याच्यावर ठाम विश्वास ठेवला तर ते नक्कीच सत्यात उतरतं. २०२३चे आभार मानतो  आयुष्यभर लक्षात राहतील अशा आठवणी दिल्या आहेत. आगामी वर्षसुद्धा असंच असु दे अशी आशा आहे

'तुला शिकवीन चांगलाच धडा'मधली अक्षरा म्हणजेच शिवानी रांगोळे म्हणाली की, २०२३ची माझी आवडती आठवण तेव्हाची आहे जेव्हा माझी मालिका 'तुला शिकवीन चांगलाच धडा' सुरु झाली. अक्षराची भूमिका एका शिक्षिकेची आहे आणि योगायोग असा की माझी आई शिक्षिका होती म्हणून हे पात्र माझ्या खूप  जवळच आहे. या मालिकेची टीम इतकी मजेशीर आहे की काम करता करता खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला ही मिळतात. २०२३ मला स्वतःची काळजी कशी घ्यायची हे शिकवून जात आहे. काम आणि कुटुंब संतुलन कसं ठेवायचं हे ही त्यांनी मला शिकवले. २०२३ माझ्यासाठी खूप अविस्मरणीय वर्ष आहे मनासारखा  प्रोजेक्ट, आवडणारी माणसं आयुष्यात आली. २०२३ला निरोप देताना येणारं नवीन वर्ष सुद्धा सुखाचे असु दे.

तर दक्षता जोईल म्हणजेच 'सारं काही तिच्यासाठीची' निशीने २०२३ला निरोप देताना म्हटले की, २०२३ मध्ये मी आई बाबांच्या आणि प्रेक्षकांच्या आशिर्वादाने अनपेक्षित गोष्टी घडल्या. माझ्या कडून ज्या चुका झाल्याआहेत, ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत त्या करायला २०२३ नी एक ऊर्जा दिली. २०२३ मध्ये खूप चांगली माणसं माझ्या आयुष्यात आली, मला एक भव्य संधी मिळाली. मला झी मराठी अवॉर्ड्स सोहळ्यात अवॉर्ड मिळाला. २०२३ कडून मी हे शिकले की प्रत्येक दिवस सारखा नसतो पण जर तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्ही तुमचा दिवस घडवू शकता.

सातव्या मुलीची सातवी मुलगीमधली रुपाली म्हणजेच ऐश्वर्या नारकर म्हणाल्या की, २०२३ मधली  माझी आवडती आठवण म्हणजे एका बोक्याला पुष्कळ दुखापत झाली होती आणि मी त्याला दवाखान्यात नेऊन त्याचा जीव वाचवला. त्याला झालेली इजा इतकी गंभीर होती की त्याचे वाचणे कठीण होते. पण वेळेत उपचार मिळाल्यामुळे तो ठणठणीत झाला. मग मी त्याला त्याच्या घराच्या इथे पोहचवून आली. मला असा वाटते की मुक्या जनावरांना आपल्या साथीची गरज आहे आणि त्यांची मदत करून माझं मन प्रसन्न होतं. २०२३ मला हे शिकवून जात आहे की आपण एकमेकांचा विचार केला पाहिजे. या वर्षी मी नवीन कार्यांशी जोडली गेली जे प्राण्यांची काळजी घेतात . २०२३ ला निरोप देताना हेच सांगेन खूप समाधान दिलेस तू म्हणून तुझे मनापासून आभार. 

तितिक्षा तावडे म्हणजेच सातव्या मुलीची सातवी मुलगी मधली नेत्रा म्हणाली की, २०२३ मधली बेस्ट आठवण म्हणजे माझा वाढदिवस खूप छान साजरा झाला. आई, बाबा, माझी बहीण, भाऊजी, भाचा आणि  माझ्या काही महत्वाच्या माणसांनी माझा दिवस संस्मरणीय बनवला. २०२३ ने मला संयम ठेवायला शिकवले. २०२२ मध्ये ज्या गोष्टी माझ्याकडे नव्हत्या त्या मला २०२३ने दिल्या आणि तीच खूप मोठी शिकवण होती. २०२३ने मला शिकवले की थोडा संयम ठेवलास तर  जे हवं ते तुझ्या पर्यंत येणार. २०२३ चे फक्त आभार मानीन त्यांनी मला खूप काही दिले ज्यासाठी मी प्रार्थना करायचे त्यागोष्टी आता माझ्या आहेत. २०२३ नी मला भरपूर प्रसिद्धी, सातव्या मुलीची सातवी मुलगी सारखा शो आणि प्रेक्षकांचे अपार प्रेम दिले. 

टॅग्स :ऐश्वर्या नारकरतितिक्षा तावडेशिवानी रांगोळे