ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - सुरांचा थांगपत्ता नसतानाही आपल्या जगावेगळ्या गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालणा-या ढिंच्यॅक पूजाचे व्हिडीओ यापुढे पाहता येणार नाहीत. कारण युट्यूबने ढिंच्यॅक पूजाचे सर्व व्हिडीओ डिलीट केले आहेत. ही कोणतीही मस्करी नसून खरंच युट्यूबने व्हिडीओ डिलीट केले आहेत. आता तसं पाहायला गेलं तर ढिंच्यॅक पूजाच्या चाहत्यांसाठी ही एक वाईट बातमी आहे, पण असेही काहीजण आहेत जे या गाण्यांनी अक्षरक्ष: त्रस्त होते, त्यांच्यासाठी ही खूशखबरच आहे. ट्विटर अनेकांनी आपला आनंद व्यक्त केला असून शेवटी अच्छे दिन आले असल्याचं म्हटलं आहे.
युट्यूबने ढिंच्यॅक पूजाचे जे काही हिट होते ते सर्व 12 व्हिडीओ डिलीट केले आहेत. "सेल्फी मैने ले ली आज", "स्वॅगवाली टोपी", "दिलो का स्कूटर", "दारु" अशी काही ढिंच्यॅक पूजाची गाणी चांगलीच हिट झाली होती. तिच्या युट्यूब चॅनेलला 30 कोटीहून जास्त व्ह्यूज आहेत. मिळालेल्या माहितीनुसार युट्यूबवरुन पूजा महिन्याला दोन ते चार लाखांची कमाई करत होती.
आता सुदैव म्हणा किंवा दुर्देवाने तिच्या 1 लाख 78 हजार 996 सबस्क्राईबर्सना त्यांची आवडती गाणी पाहता येणार नाहीत. कथप्पा सिंह नावाच्या व्यक्तीने ढिंच्यॅक पूजाच्या व्हिडीओंवर कॉपीराईटचा दावा केला होता. त्याच्या कॉपीराईट नोटीसनंतरच युट्यूबने हे व्हिडीओ डिलीट केल्याची माहिती आहे.
युट्यूबच्या नियमानुसार जर कोणी तुमच्या परवानगी तुमचा व्हिडीओ अपलोड केला असेल तर तुम्ही व्हिडीओ काढून टाकण्याची विनंती करु शकता. तक्रार करणारा कथप्पा सिंह कदाचित एखाद्या व्हिडीओमध्ये दिसला असल्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्याने ही नोटीस पाठवली असावी. किंवा कथप्पा सिंहने ढिंच्यॅक पूजासोबत काम केलं असावं, मात्र त्याला मोबदला मिळाला नसावा हिदेखील शक्यता आहे.