अलीकडच्या काळात भारतीय सिनेसृष्टीत खेळांवर आधारित असलेल्या सिनेमांची संख्या वाढली आहे. क्रिकेट, अॅथलेटिक्स, बॅाक्सिंग, हॅाकी या खेळांवर आधारित असलेले बरेच सिनेमे आजवर बनले आहेत, पण अद्याप कोणीही सगळ्यांच्या आवडत्या गोटयांच्या खेळांवर सिनेमा बनवलेला नाही. दिग्दर्शक वसंतराव भगवान पाचोरे आणि निर्माते जय केतनभाई सोमैया यांनी नेमकी हीच गोष्ट हेरली आणि ‘गोटया’ या खेळावर सिनेमा बनवला. या सिनेमात महाराष्ट्राच्या मातीतील रंगीबेरंगी गोटयांचा डाव मांडला आहे. जो उद्यापासून सर्व चित्रपटगृहात रंगणार आहे.
राजेश श्रृंगारपुरे, सयाजी शिंदे यांसारखे मातब्बर कलाकार असल्याने ‘गोटया’ ला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालं आहे. या चित्रपटात भूमिका करणाऱ्या कलाकारांनीही या खेळाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मातीतील हा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवरही खेळला जातो, पण आपण यापासून अनभिज्ञ असल्याने या खेळाला कमी दर्जाचा लेखतो असं राजेश श्रृंगारपुरे म्हणतात. गोटयांचा खेळ प्रत्येक शाळेत खेळला जावा या शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत सयाजी शिंदे म्हणाले की, या सिनेमाच्या निमित्ताने गोटयांचा खेळ प्रथमच पडद्यावर आला आहे. आज नामशेष झालेला हा खेळ पुनरुज्जीवत व्हावा असं मला मनापासून वाटतं. या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या बालपणीच्या आठवणी जाग्या होतील आणि हा सिनेमा गोटयांचा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी सोयीस्कर ठरेल असा विश्वास भगवान पाचोरे यांना वाटतो.
विहान प्रोडक्शन आणि द्वारा मोशन पिक्चर यांनी ‘‘गोटया’ या सिनेमाची निर्मिती केली आहे. नैनेश दावडा व निशांत राजानी यांची सहनिर्मिती असलेल्या ‘गोटया’ ची कथा-पटकथा-संवाद-गीतलेखन भगवान पाचोरे यांनी केलं आहे. ऋषिकेश वानखेडे या नवीन मुलाने या सिनेमात शीर्षक भूमिका साकारली आहे. त्याच्या जोडीला राजेश श्रृंगारपुरे, सयाजी शिंदे, आनंद इंगळे, कमलाकर सातपुते, सुरेखा कुडची, हेमांगी राव, शरद सांखला, शशांक दरणे, पोर्णिमा आहिरे आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. संगीतकार अवधूत गुप्ते यांनी त्यावर संगीत दिर्ग्शन केलं असून, रोहित नागभिडे यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. गणेश आचार्यने कोरिओग्राफी, बाशालाल सय्यद यांनी छायालेखन, संकलन राहुल भातणकरने संकलन केलं आहे. बाबासाहेब पाटील आणि विशाल चव्हाण या सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत. उद्यापासून ‘गोटया’ सर्वत्र प्रदर्शित होतोय.