गोविंदाने बॉलिवूडमध्ये एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. पण त्याच्या व्यवसायिक आयुष्याइतकेच त्याचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत असतं. तुम्हाला माहीत आहे का, गोविंदाचे एका अभिनेत्रीसोबत अफेअर होते आणि तिच्या बेडरूममधून चक्क नाईट ड्रेसमध्ये तो बाहेर आला होता.
हद कर दी आपने या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी राणी मुखर्जी आणि गोविंदा यांच्यात प्रेम फुलले असल्याचे म्हटले जाते. गोविंदा आणि राणी यांच्यात अनेक वर्षं अफेअर होते. गोविंदाच्या स्वभावामुळे राणी त्याच्यावर फिदा झाली होती आणि त्याच्यात प्रेमप्रकरण सुरू झाले अशी त्यावेळी चर्चा रंगली होती.
हद कर दी आपने या चित्रपटाच्या वेळी राणी ही बॉलिवूडमध्ये खूपच नवीन होती तर गोविंदाने तोपर्यंत एक यशस्वी अभिनेता म्हणून आपले नाव कमावले होते. गोविंदाच्या नावावरच चित्रपट चालत असत. त्यामुळे इंडस्ट्रीत त्याच्या नावाचा प्रचंड दबदबा होता. त्यामुळे राणीला चित्रपटात घेण्यासाठी तो निर्माते, दिग्दर्शक यांना सांगत असे. गोविंदाने राणीला अनेक चित्रपट मिळवून दिले असे म्हटले जाते.
हद कर दी आपने या चित्रपटाच्यावेळी गोविंदाचे लग्न सुनीतासोबत झाले असून त्याला दोन मुलेदेखील होती. त्यामुळे ही गोष्ट सुनीताला कळू नये यासाठी गोविंदा अनेक प्रयत्न करत होता. त्यामुळे तो आणि राणी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी न भेटता अनेकवेळा राणीच्या वर्सोव्याच्या फ्लॅटमध्ये भेटत असत. या फ्लॅटमध्येच त्यांना एका पत्रकाराने एकत्र पाहिले होते. एमटिव्ही इंडिया या वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार राणी मुखर्जीची मुलाखत घेण्यासाठी एक पत्रकार तिच्या घरी गेली होती. त्यावेळी राणीच्या रूममधून अचानक गोविंदा बाहेर आला. त्यावेळी त्याने नाइट ड्रेस घातला होता. यानंतर राणी आणि गोविंदाच्या प्रेमकथेची चांगलीच चर्चा सगळीकडे रंगली होती.
पण राणीने दिलेल्या एका मुलाखतीत या सगळ्या गोष्टी चुकीच्या असल्याचे म्हटले होते. तिने म्हटले होते की, गोविंदासोबत एखाद्या अभिनेत्रीने तीन-चार चित्रपटांत काम केले की, त्या अभिनेत्रीचे नाव गोविंदासोबत जोडले जाते हे आपण अनेक वर्षांपासून पाहात आहोत. तसेच काहीसे माझ्या बाबतीत घडले आहे.