जॉन अब्राहमच्या पहिल्या निर्मिती पदार्पणामुळे ‘सविता दामोदर परांजपे’ हा मराठी सिनेमा चर्चेचा विषय झाला होता. नुकताच या चित्रपटाचा शानदार प्रीमियर अभिनेता जॉन अब्राहम व कलाकारांच्या उपस्थितीत संपन्न झाला. एका वेगळ्या विषयावर चित्रपट केल्याचं समाधान व्यक्त करतानाच उपस्थित सर्वांचे आभार निर्माता जॉन अब्राहमने याप्रसंगी व्यक्त केले. सर्व कलाकारांच्या सहकार्यामुळे चांगला चित्रपट करता आल्याची भावना व्यक्त करतानाच दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे–जोशी यांनी कलाकारांच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. या प्रीमियरला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. एका सुंदर कलाकृतीचा अनुभव घेता आला असं सांगत उपस्थित मान्यवरांनी या सिनेमाचे कौतुक केले आहे.
‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकावर बेतलेल्या या सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे. रिमा लागू यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या नाटकाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. हा चित्रपटसुद्धा प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी झाल्याच्या भावना उपस्थित प्रेक्षकांनी यावेळी व्यक्त केल्या.
‘जे.ए.एन्टरटेन्मेंट’ आणि ‘पॅनोरमा स्टुडिओज’ ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे आदी कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. चित्रपटाची कथा शेखर ताम्हाणे यांची असून लेखन आणि संवाद शिरीष लाटकर यांचे आहेत. मंदार चोळकर, वैभव जोशी लिखित या चित्रपटातील गीतांना निलेश मोहरीर आणि अमित राज यांचं सुश्राव्य संगीत लाभले आहे. योगेंद्र मोगरे, तृप्ती मधुकर तोरडमल या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. छायांकन प्रसाद भेंडे तर संकलन क्षितिजा खंडागळे यांचे आहे. कलादिग्दर्शन संतोष फुटाणे, ध्वनी संयोजन प्रणाम पानसरे यांचे आहे. वेशभूषा मालविका बजाज यांनी तर मेकअप विनोद सरोदे यांनी केला आहे. हा चित्रपट आज महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला आहे.
‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाद्वारे तृप्ती तोरडमल मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश करत आहे. ती ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांची कन्या आहे.