हिंदी चित्रपट : अनुज अलंकार
दिग्दर्शक विकास बहल म्हटले की, डोळ्यासमोर येतो तो कंगनाचा क्वीन. अर्थातच त्यामुळे शानदार या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. पण, या चित्रपटाच्या माध्यमातून अनेक संधी असूनही दिग्दर्शक फारसा प्रभाव दाखवू शकले नाहीत.
चित्रपटाच्या कथानकाचा मुख्य आधार आहे एक विवाह समारंभ. बिपीन अरोडा (पंकज कपूर) यांची मुलगी ईशा कपूरचा (सनाह कपूर) विवाह समारंभ आहे. यात वेडिंग प्लानर म्हणून जोगिंदरची (शाहिद कपूर) एंट्री होते. मात्र, जोगिंदरची लव्ह स्टोरी आलिया (आलिया भट्ट) सोबत सुरू होते. आलिया ही बिपीन यांची मानलेली मुलगी आहे. या विवाहात एक डीलही आहे. ही डील हॅरी फंडवानी (संजय कपूर) आणि ईशाची दादी (सुषमा सेठ) यांच्यात आहे. प्रचंड श्रीमंत असलेला हॅरी आपल्या परिवाराला आर्थिक तंगीतून बाहेर काढेल, असा अंदाज बांधूनच दादी या विवाहासाठी पुढाकार घेते. अर्थात या व्यवहारातील
वास्तव जाणूनही ईशा कुटुंबाच्या भल्यासाठी होकार देते आणि सासरच्या मंडळींच्या चुकांवरही पांघरूण घालत राहते.
विवाहाच्या या समारंभात दुसरीकडे जोगिंदर आणि आलिया यांची लव्ह स्टोरी रंगत जाते. जोगिंदरला जेव्हा ईशाच्या विवाहाची व्यावहारिक बाजू समजते तेव्हा तो ईशाच्या बाजूने उभा राहतो. याच वेळी बिपीन आणि आलिया यांच्यातील नातेसंबंधही पुढे येतात. भावभावना आणि संवेदनांच्या हिंदोळ्यावरून कथेचा हॅपी एंड होतो.
उणिवा : विकास बहलचे दिग्दर्शन हीच चित्रपटाची सर्वात मोठी दुबळी बाजू आहे. चित्रपटातील पात्रंना ते न्याय देऊ शकले नाहीत. एकीकडे शाहिदच्या रोमान्सला हायलाईट करताना दुसरीकडे चित्रपट संथ होत जातो, तर मध्येच कथानक एकदम गती घेते. शाहिद आणि पंकज कपूर यांच्यातील केमिस्ट्री जमली नाही. व्हिलनच्या रूपात पुनरागमन झालेला संजय कपूर फारसा प्रभाव पाडू शकला नाही. रोमान्सच्या नावावर अश्लीलताच दिसून येते.
वैशिष्टय़े : आलिया आणि शाहिद यांची केमिस्ट्री एक जमेची बाब म्हणावी लागेल. लव्ह स्टोरीसोबत कॉमेडीचा तडका प्रेक्षकांना हसायला लावतो. पंकज कपूरचा अभिनयही चांगला आहे. चित्रपटाचे संगीतही वेगळी अनुभूती देणारे आहे.
का पाहावा? शाहिद-आलिया जोडीची धमाल पाहायला हरकत नाही.
का पाहू नये? दुबळी कथा आणि दिग्दर्शन