Join us

PMच्या राज्यात 'पठाण'ला 'प्रोटेक्शन'; शाहरुखचा सिनेमा दाखवणाऱ्या गुजरातमधील थिएटरना पोलिसांचं कवच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 2:55 PM

पंतप्रधानांच्या अहमदाबादमध्ये बजरंग दलाने थिएटरमध्ये पठाणचे पोस्टर फाडत निषेध केला होता. पठाण प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला होता.

Pathaan : राज्यात 'पठाण' च्या वादाने चांगलाच धुमाकूळ घातला. पठाण मधील 'बेशरम रंग' गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या बिकिनीवरुन काही संघटना आक्रमक झाल्या होत्या. दरम्यान बॉयकॉट पठाण ट्रेंडच सुरु झाला. इतकंच नाही तर पठाण थिएटरमध्ये प्रदर्शितच होऊ देणार नाही अशा धमक्या मेकर्सला आणि थिएटर्सला मिळाल्या. काही दिवसांपूर्वी अहमदाबादमध्ये बजरंग दलाने थिएटर मध्ये तोडफोड केली होती. पठाणच्या पोस्टरला लाथाबुक्क्या मारण्यात आल्या होत्या. येत्या पाच दिवसात पठाण रिलीज होत आहे. त्यामुळे गुजरात सरकारकडून थिएटर्सना पोलिस संरक्षण देण्यात येणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.आता सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत आहे. प्रिबुकिंगही जोरदार सुरु आहे. मात्र गुजरातमधील चित्रपटचगृह मालकांना नुकसानीची भीती आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) गुजरात सरकारनेच चित्रपटगृहांना पोलिस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात मल्टिप्लेक्स असोसिएशनने मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली होती. यानंतर सरकारने पोलिस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. 

गुजरात मल्टिप्लेक्स असोसिएशनचे सचिव वंदन शाह यांनी पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, ' सरकारी अधिकाऱ्यांसोबत महत्वपूर्ण बैठक झाली. पठाण सिनेमाचे प्रदर्शन शांततेत व्हावे यासाठी त्यांनी पोलिस सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन दिले आहे. गृहमंत्र्यांनी सर्व पोलिस स्टेशनमध्ये आणि पोलिस आयुक्तांना तसे निर्देशही दिले आहेत. 

विश्व हिंदू परिषदेने नेमका काय इशारा दिला होता ?

४ जानेवारी रोजी अहमदाबादच्या अल्फा मॉल मध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत पठाणचा विरोध केला होता. शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते मॉलमध्ये दाखल झाले होते. मॉलच्या कर्मचाऱ्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला पण कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा होता. अहमदाबादच्या अल्फा मॉलमध्ये असलेल्या थिएटर मध्ये हा हंगामा करण्यात आला. याठिकाणी शाहरुखच्या पठाणचे पोस्टर लावण्यात आले होते. ते पोस्टर लाथाबुक्क्यांनी फाडले. चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशा इशाराही यावेळी त्यांनी दिला. तसंच जय श्री राम चा जयघोष करण्यात आला.

विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते हितेंद्रसिंग राजपूत म्हणाले होते की, 'गुजरातमध्ये पठाण प्रदर्शित होऊ देणार नाही. आज मॉलमध्ये केलेले प्रदर्शन हा इशाराच आहे. थिएटर चालकांनी पठाण रिलीज करु नये' यानंतर थिएटर मालकांनी सरकारला पत्र लिहिलं होतं. 

Pathaan Movie : किंग खानसाठी चाहत्यांचे 'खास गिफ्ट', तब्बल ५० हजार चाहते एकत्र येत पठाण बघण्याच्या तयारित

येत्या २५ जानेवारी रोजी पठाण प्रदर्शित होणार आहे. तीव्र विरोध झुगारत सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यातच पंतप्रधानांच्या गुजरात राज्यात सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही अशी धमकीच संघटनांनी दिल्याने वाद चिघळला होता. एकीकडे सिनेमाची लोकप्रियता वाढतच चालली असताना गुजरात मध्ये नेमकं काय चित्र बघायला मिळणार याची उत्सुकता आहे.

टॅग्स :पठाण सिनेमाशाहरुख खाननरेंद्र मोदीभूपेंद्र पटेलनाटकपोलिस