२०१९ साली रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि आलिया भटचा (Alia Bhatt) 'गली बॉय' (Gully Boy) रिलीज झाला होता. सिनेमाची कथा, गाणी, कलाकारांचा अभिनय सगळंच अप्रतिम होतं. आजही हा सिनेमा चाहते आवडीने पाहतात. दरम्यान आता सिनेमाच्या सीक्वेलची चर्चा सुरु आहे. मात्र रणवीर-आलियाच्या चाहत्यांची निराशा होऊ शकते. कारण यामध्ये दोघांच्या जागी फ्रेश जोडी दिसणार असल्याची चर्चा आहे.
मुंबईतील झोपडपट्टीचा भाग, रॅपच्या विश्वात याच भागातून आलेला तरुण ज्याच्या टॅलेंटची ओळख जगाला झाली अशा आशयाचा हा सिनेमा प्रेक्षकांना भावणारा होता. यातील डायलॉग, गाणी, रॅप खूप गाजलं. आलियाच्या काही डायलॉग्सने तर धुमाकूळच घातला होता. सिनेमाला अनेक फिल्मफेअर अवॉर्ड्सही मिळाले. फिल्मफेअर रिपोर्ट्सनुसार, सिनेमाच्या सीक्वेलची चर्चा आहे. मात्र यामध्ये रणवीर-आलिया दिसणार नाहीत. तर विकी कौशल आणि अनन्या पांडे ही फ्रेश जोडी दिसणार असल्याची शक्यता आहे. 'खो गए हम कहा' सिनेमाचे दिग्दर्शक अर्जुन वरेन सिंह 'गली बॉय २' (Gully Boy 2) च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. सिनेमात अनन्या पांडे परफेक्ट असेल असं ते म्हणाले.
विकी कौशल आणि अनन्या पांडे अद्याप एकत्र पडद्यावर झळकलेले नाहीत. दोघांचा वेगळा चाहतावर्ग आहे. त्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तर दुसरीकडे रणवीर-आलियाच्या चाहत्यांची निराशा झाली आहे. अद्याप सिनेमाबाबतीत आणि कास्टिंगबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.