नवी दिल्ली : चित्रपट समीक्षक व प्रेक्षकांकडून दाद मिळवणारा रणवीर सिंग व आलिया भट्टचा ‘गली बॉय’ हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत उतरला आहे. ‘बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म’ या कॅटेगरीसाठी गली बॉयची भारताकडून निवड करण्यात आली आहे. ‘गली बॉय’सह ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’, ‘केसरी’, ‘बधाई हो’, ‘आर्टिकल १५’ आणि ‘अंधाधून’ आदी चित्रपट ऑस्करवारीच्या स्पर्धेत होते. मात्र या सर्व सिनेमांवर गली बॉयने मात केली आहे.
झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटात झोपडपट्टीत लहानाचा मोठा झालेला आणि आपल्या स्वप्नांसाठी धडपडणाऱ्या २६ वर्षीय डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा दाखविण्यात आली आहे. याआधी मेलबर्नमध्ये पार पडलेल्या भारतीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये गली बॉयला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार देण्यात आला होता. दक्षिण कोरियातील २३व्या बुकियॉन इंटरनॅशनल फॅन्टॅस्टिक फिल्म फेस्टिव्हलमध्ये नेटवर्क फॉर द प्रमोशन ऑफ एशियन सिनेमाचा पुरस्कारही गली बॉयला मिळाला होता.