मार्वल स्टुडिओच्या (Marvel Studios) सिनेमांची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. गेल्या रविवारी मार्वलने आपल्या 11 आगामी सिनेमांच्या रिलीज डेटची घोषणा केली आणि यावेळी मार्वलच्या एका सिनेमाच्या व्हिडीओतील एक भारतीय चेहरा पाहून भारतीय चाहते सुखावले. हा चेहरा कुणाचा तर इबू हटेलाचा. होय, म्हणजेच अभिनेते हरीश पटेल यांचा.मार्वलच्या ‘ इटर्नल्स’ (Eternals) मध्ये हरीश पटेल दिसणार आहेत, हॉलिवूडच्या इतक्या मोठ्या सिनेमात हरीश पटेल (Harish Patel) यांना पाहून चाहत्यांचा आनंद गगणात मावेनासा झाला.
‘ इटर्नल्स’च्या टीजर व्हिडीओतील भारतीय कनेक्शन लोकांनी लगेच शोधून काढले. पण ‘ इटर्नल्स’च्या आयएमडीबी पेजवर हरीश पटेल यांच्या नावाचा उल्लेख नव्हता. अधिकृतपणे काहीच सांगितले गेले नव्हते. त्यामुळे टीजरमध्ये दिसले ते हरीश पटेलच का? असा प्रश्न लोकांना पडला. आपला इबू हटेला इतक्या मोठ्या हॉलिवूड प्रोजेक्टचा भाग आहे, यावर क्षणभर लोकांचा विश्वास बसेना. पण शेवटी विश्वास बसलाच. कारण यानंतर या टीजरमधील चेहरा हरीश पटेल यांचाच असल्याचे स्पष्ट झाले.
खुद्द हरीश पटेल यांनी यानंतर इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत, तो मीच हे स्पष्ट केले. तुम्ही ज्याला टीजरमध्ये बघितले, तो मीच आहे. मी Eternals मध्ये काम करतोय. पण सध्या याबद्दल फार काही सांगू शकत नाही. मेकर्सनी अद्याप माझ्या नावाची घोषणा केलेली नाही. त्यामुळे मी त्याची प्रतीक्षा करेन, असे त्यांनी सांगितले.हॉलिवूड सिनेमांत काम करण्याची हरीश यांची ही पहिली वेळ नाही. याआधी रन फॅटबॉय रन, ऑल इन गुड टाईम, टुडेज स्पेशल, मिस्टर स्टिंक अशा काही हॉलिवूड सिनेमातही त्यांनी काम केले आहे.हरीश पटेल हे बॉलिवूडचे हरहुन्नरी अभिनेते आहेत. दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या ‘मंडी’ या सिनेमापासून त्यांनी आपल्या करिअरची सुरूवात केली होती. एकेकाळी बॉलिवूडच्या जवळपास प्रत्येक सिनेमात त्यांचा कॉमिक वा निगेटीव्ह रोल दिसायचाच. पण त्यांना खरी ओळख दिली ती इबू हटेलाच्या भूमिकेने. मिथुन चक्रवर्ती स्टारर ‘गुंडा’ या सिनेमात त्यांनी इबू हटेलाची भूमिका साकारली होती. या सिनेमातील माँ मेरी चुडैल बाप की बेटी, बाप मेरा शैतान का चेला, हा त्यांचा डायलॉग प्रचंड व्हायरल झाला होता.
इटर्नल्सबद्दल सांगायचे तर हा सिनेमा ऑस्कर विजेते दिग्दर्शक Chloe Zhao यांनी दिग्दर्शित केला आहे. येत्या 5 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात अँजेलिना जोली, सलमा हायेक, रिचर्ड मैडेन आदींच्या मुख्य भूमिका आहेत.