'तारक मेहता का उल्टा चष्मा' अभिनेता गुरचरण सिंग गायब झाल्याच्या बातमीने केवळ इंडस्ट्रीलाच नाही तर चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. गुरुचरण जवळपास २५ दिवसांपासून बेपत्ता होता. तो हे सर्व सोडून कुठे गायब झाला आणि त्यामागचं नेमकं कारण काय होतं, गायब होता तेव्हा त्याची नेमकी परिस्थिती काय होती, तो कसा जगत होता? याबाबत आता त्याने स्वत:च माहिती दिली आहे.
एका मुलाखतीत गुरुचरण सिंग याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की, त्यांच्या बेपत्ता होण्यामागचं खरं कारण काय आहे. त्याने सांगितलं की त्याला त्याच्या जवळच्या लोकांनी खूप दुखावलं होतं, म्हणून तो हे सर्वकाही सोडून गेला होता. "एक वेळ अशी येते जेव्हा तुम्ही स्वतःला कुटुंब आणि जगापासून वेगळे करता. काम शोधण्याचा प्रयत्न करूनही, माझ्या जवळच्या लोकांमुळे मला खूप त्रास झाला."
"माझ्यावर अजूनही कर्ज आहे"
"मला सतत रिजेक्शन येत होतं. एवढं सगळं करूनही माझ्या मनात विचार आला की काहीही झालं तरी मी आत्महत्येचा विचार करणार नाही. कर्ज बुडल्यामुळे किंवा ते फेडता न आल्याने गायब झालो नाही. माझ्यावर अजूनही कर्ज आहे. मी पेमेंट करत आहे. माझा हेतू चांगला आहे" असं गुरुचरण सिंग याने सांगितलं.
१७ दिवस घातली एकच ट्राउजर
घर सोडून गेलेल्या गुरुचरणने अनेक कठीण दिवस पाहिल्याचं म्हटलं आहे. पिंकव्हिलाशी बोलताना गुरुचरणने सांगितलं की तो रेल्वे प्लॅटफॉर्म आणि बस स्टॉपवर रात्र काढत असे. एकदा त्याने १७ दिवस एकच ट्राउजर घातली आणि अनेक वेळा ओले कपडे घातले कारण त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.
"प्रवास करताना नीट झोप लागावी म्हणून मी जनरल तिकिटावर जनरल डब्यातून प्रवास करायचो. रात्र काढायला जागा नसल्याने रेल्वे प्लॅटफॉर्म किंवा बस स्टँडवर झोपायचो. मात्र, विविध कारणांमुळे रात्री चांगली झोप लागणं कठीण झालं होतं."
"दररोज टी-शर्ट धुवून पुन्हा घालायचो. कधी कधी पर्याय नसल्यामुळे तोच ओला टी-शर्ट घालायचो" असंही म्हटलं आहे. २२ एप्रिलला गुरुचरण दिल्लीहून मुंबईला जाणार होता, पण तो विमानापर्यंत पोहोचला नाही आणि बेपत्ता झाला. तो १८ मे रोजी परतला. आपल्या वैयक्तिक समस्यांमुळे गायब झाल्याचं त्याने म्हटलं आहे.