Join us  

सैन्यात जायला आम्ही सांगितलं होतं का ? ओम पुरींकडून शहिदांचा अपमान

By admin | Published: October 04, 2016 6:47 AM

उरी दहशतवादी हल्ल्यात भारतीय जवान शहिद झाले असताना त्यावर संताप व्यक्त करण्याऐवजी त्यांना सैन्यात जायला आम्ही सांगितलं होतं का ? असं संतापजनक वक्तव्य केलं आहे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 4 - उरी दहशतवादी हल्ल्यात भारतीय जवान शहिद झाले असताना त्यावर संताप व्यक्त करण्याऐवजी त्यांना सैन्यात जायला आम्ही सांगितलं होतं का ? त्यांना शस्त्र उचलण्यास कोणी सांगितलं ? असे वादग्रस्त प्रश्न ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांनी विचारले आहेत. उरी दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात असताना त्या पार्श्वभुमीवर चित्रपट निर्माता संघटनेने पाकिस्तानी अभिनेत्यांवर बंदी घातली आहे. याच विषयावर एका वृत्तावाहिनीवरील चर्चेदरम्यान ओम पुरी यांनी हे वादग्रस्त आणि संतापजनक वक्तव्य केलं आहे.
 
यावेळी ओम पुरी यांनी पाकिस्तानी कलाकार व्हिसा घेऊन भारतात येतात असं सागंत त्यांची बाजू घेतली. मात्र त्यानंतर अॅकरने दहशतवादी हल्ल्यानंतरही पाकिस्तानी कलाकरांची बाजू का घेता ? असा प्रश्न विचारला असता  ओम पुरींचा पारा चढला. जवानांना सैन्यात जायला आम्ही सांगितलं होतं का ? त्यांना शस्त्र उचलण्यास कोणी सांगितलं ? असे उलट सवाल ओम पुरी यांनी अँकरला विचारले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर 15 ते 20 लोकांचं आत्मघाती पथक तयार करा आणि पाकिस्तानला पाठवून स्फोट घडवून आणा असंही बोलले आहेत. 
 
भारत - पाकिस्तानचं इस्त्राईल आणि पॅलेस्टाईनसारखं व्हावं आणि लढत राहावं अशी तुमची इच्छा आहे का ? भारतामध्ये करोडो मुस्लिम राहतात त्यांना युद्धासाठी डिवचू नका असंही ओम पुरी बोलले आहेत. भारत पाकिस्तानचं विभाजन फक्त देशांचं नाही तर कुटुंबांचंही विभाजन होतं. अनेक भारतीयांचे नातेवाईक पाकिस्तानात राहतात, त्यांच्याशी ते युद्ध कसे करणार असं ओम पुरींचं म्हणणं आहे.
 
ओम पुरी यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावरुन प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. बॉलिवूडमधूनही ओम पुरी यांच्या वक्तव्यावर टीका करण्यात येत असून अभिनेते परेश रावल आणि अनुपम खेर यांनी खेद व्यक्त केला आहे.
 
उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेल्याने पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. फवाद खान आणि माहीरा यांचे 'ए दिल है मुश्किल' आणि 'रईस' चित्रपट प्रदर्शन होणं मुश्किल झालं आहे. पाक कलाकरांनी भारतीय चित्रपटसृष्टीत काम कराव का नाही यावर कोणी समर्थनार्थ उतरलं तर कोणी विरोध दर्शवला आहे. पाक कलाकारांकडे अधिकृत व्हिसा असून त्यांनी भारतात अवैध प्रवेश केलेला नाही, अशी कड ओम पुरी यांनी घेतली आहे.ते म्हणाले, पाकिस्तानी कलाकार हे अधिकृत वर्क व्हिसावरच भारतात काम करत आहेत. त्यामुळे अचानक त्यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांच्या चित्रपटात कोट्यवधी रुपये गुंतवणाऱ्या भारतीय निर्मात्यांनाच मोठा फटका बसणार आहे. हा निर्णय सरकारी पातळीवर घेतला गेला असता, तर गोष्ट वेगळी होती. सरकार कारवाई करत असताना आपण शांत बसायला हवं. पाकिस्तानी कलाकारांना इथेच राहू देणं किंवा परत पाठवणं यामुळे फारसा काही फरक पडत नाही. मी सहा वेळा पाकला गेलो आहे. त्यांच्याकडून योग्य प्रेम आणि आदर मिळाला आहे असंही पुरी यांनी सांगितलं.