शाहरुख खानच्या भूमिका, त्याचे संवाद अशा अनेक गोष्टी प्रचंड गाजल्या. शाहरुखचे चाहते त्याचे संवाद तोंडपाठ करतात. आजही शाहरुखचं नाव घेतलं तर एक संवाद चटकन आठवतो तो म्हणजे क..क..क..किरण. शाहरुखची मिमिक्री करणारे कलाकार सुद्धा हा डायलॉग आवर्जून म्हणत हशा पिकवतात. 'डर' सिनेमातला हा डायलॉग प्रसिद्ध कसा झाला? याशिवाय हा संवाद म्हणताना शाहरुखने कोणत्या दिग्दर्शकापासून प्रेरणा घेतली? याचा खुलासा जुही चावलाने एका मुलाखतीत केलाय.
या व्यक्तीला पाहून शाहरुखने म्हटला आयकॉनिक संवाद
गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री कार्यक्रमात झालेल्या संभाषणादरम्यान, जुही चावलाने शाहरुख खानच्या क..क..किरण हा डायलॉग बोलण्याच्या पद्धतीबद्दल खुलासा केला. जुहीने 'आय लव्ह यू kk..kk..किरण' हा डायलॉग शाहरुख कसा बोलला हे सांगितले. जुही चावला म्हणाली की, "चित्रपटाचे दिग्दर्शक यश चोप्रा थोड्याशा तोतरेपणाने बोलत असत. जुहीने याकडे लक्ष दिले नव्हते, पण शाहरुखने त्यांची ही सवय हेरली. त्यामुळे शाहरुखनेही तोतरेपणाने डायलॉग बोलण्याचं ठरवलं. जेव्हा प्रेक्षकांनी हा संवाद ऐकला तेव्हा त्यांच्या मनात हा संवाद आणि शाहरुखची बोलण्याची पद्धत एकदम फिट बसली." अशाप्रकारे यश चोप्रांना पाहून शाहरुखने क..क..किरण हा संवाद म्हटला.
आजही डर सिनेमा सर्वांच्या आवडीचा
यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या 'डर' सिनेमाने शाहरुख खानला अँटी-हिरो म्हणून बॉलिवूडमध्ये प्रस्थापित केले. या सिनेमात शाहरुखच्या विरुद्ध सनी देओलनेही काम केले होते. हा सिनेमा २४ डिसेंबर १९९३ रोजी प्रदर्शित झाला होता. सिनेमातली 'जादू तेरी नजर', 'लिखा है ये', 'तू मेरे सामने' आणि 'आंग से अंग लगाना' ही गाणी प्रचंड हिट झाली. या सिनेमानंतर शाहरुखच्या करिअरची गाडी सुसाट पळाली.