बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणारी हंसिका मोटवानी (Hansika motwani) साऱ्यांनाच ठावूक आहे. लहान वयात अभिनयाची सुरुवात करणाऱ्या हंसिकाने बॉलिवूडमध्ये तिचं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. 'कोई मिल गया 'या सिनेमात तिने केलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडसह साऊथमध्ये आपली छाप उमटवणाऱ्या या अभिनेत्रीविषयी सोशल मीडियावर अनेक अफवाही पसरल्या. यात खासकरुन हंसिका हिच्या आईवरही काहींनी टीकास्त्र डागलं. हंसिका लवकरात लवकर मोठी दिसावी यासाठी तिच्या आईने तिला हार्मोनल इंजेक्शन दिलं असंही म्हटलं जात होतं. यावर आता हंसिकाने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
९० च्या दशकात हंसिकाने 'शका लका बूम बूम' ही मालिका केली होती. ही मालिका त्याकाळी तुफान गाजली. इतकंच नाही तर, कोई मिल गयामध्ये ती झळकल्यानंतर अनेकांनी तिच्यावर टीकास्त्र डागलं. एकीकडे तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. मात्र, दुसरीकडे हंसिकाच्या आईने तिला हार्मोन्सचं इंजक्शन देऊन लवकर मोठी करायचा प्रयत्न केला, अशी टीकाही होऊ लागली.
काय म्हणाली हंसिका?
"मी आज सुद्धा कोणतंचं इंजक्शन घेऊ शकत नाही. मला सुईची प्रचंड भीती वाटते.त्यामुळेच मी टॅटूसुद्धा काढू शकले नाहीये. आणि, मुळात कोणतीही आई असं का करेल? यावरुन हेच सिद्ध होतंय की मी करिअरमध्ये पुढे जात असताना काही जणांना इर्षा वाटू लागली होती. पण ठीक आहे. कदाचित मी काही तरी चांगलं केलं असेन. ज्यामुळे लोक माझ्याबद्दल अशी चर्चा करतायेत. त्यामुळे त्यांनाच चर्चाच करत राहू दे", असं हंसिका म्हणाली.