आदित्य नारायण सध्या सारेगमप या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. त्याचा मोहोब्बत हा अल्बम लवकरच प्रदर्शित होत आहे. तसेच गाण्याच्या, अभिनयाच्या त्याला अनेक आॅफर्स मिळत आहेत. कामात सतत व्यस्त असल्याने तो प्रचंड खूश आहे. त्याच्या या प्रवासाबाबत सीएनएक्ससोबत त्याने मारलेल्या या गप्पा...प्रश्न : सारेगमप या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गेले पाच सीझन करत आहेस, तुझा या कार्यक्रमाचा अनुभव कसा आहे?सारेगमप हा माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनला आहे. गेली दहा वर्षे मी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमामुळे मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. मी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासोबतच यात अनेक वेळा गाणी गातो. लोकांना हसवण्यासाठी काही स्कीट सादर करतो. त्यामुळे मला माझी अभिनयकलाही लोकांसमोर सादर करता येते. तसेच या कार्यक्रमात मला स्टंटही करायला मिळतात. एकाच कार्यक्रमात इतक्या सगळ्या गोष्टी करायला मिळत असल्याने मी खूप खूश आहे. प्रश्न : या कार्यक्रमातील तुझ्या जोक्सची नेहमीच चर्चा होत असते. त्याविषयी काय सांगशील?मी या कार्यक्रमात सांगत असलेले जोक्स हे अतिशय वाईट असले तरी ते लोकांना खूप आवडतात. खरे तर हे जोक्स मला लेखकांकडून लिहून दिलेले असतात. त्यामुळे यामध्ये माझे काहीच श्रेय नाहीये. कधी तरी एखादा जोक माझा स्वत:चा असतो. या जोक्सची माझ्या घरातही नेहमीच चर्चा होते. माझ्या वडिलांना एखादा जोक कळला नाही तर त्याचा अर्थ मला त्यांना सांगावा लागतो. माझे हे जोक्स इतके प्रसिद्ध होतील असे मला कधी वाटलेदेखील नव्हते. प्रश्न : तुझ्या मोहोब्बत या अल्बमच्या पहिल्या व्हिडीओची चांगलीच चर्चा झाली. या अल्बममधील इतर व्हिडीओ रसिकांसमोर कधी येणार आहेत?सारेगमपच्या फायनलला मी त्यातील एक व्हिडीओ सादर करणार आहे तर एक व्हिडीओ माझ्या वाढदिवसाला म्हणजे ६ आॅगस्टला प्रदर्शित होईल. मोहोब्बत या अल्बममध्ये एकूण आठ गाणी असून त्यातील अधिकाधिक गाणी मी स्वत: लिहिली आहेत. संगीतदेखील माझेच आहे. तसेच आठही गाणी मीच गायली आहेत. या अल्बमचे वैशिष्ट्य म्हणजे हा अल्बम मला लोकांना एकही रुपया न घेता द्यायचा आहे. त्यासाठी सध्या टी-सीरिजचे भूषण कुमार यांच्यासोबत माझी चर्चा सुरू आहे. याबाबत निर्णय लवकरच घेण्यात येईल.प्रश्न : अल्बमसाठी पैसे न घेण्यामागे काही कारण आहे का?मोहोब्बत हा अल्बम माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. त्यामुळे या अल्बममधील सगळीच गाणी लोकांनी ऐकावीत, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे मी याबाबतीत पैशांचा विचारच केलेला नाही. सध्या मी माझ्या गायनातून आणि सूत्रसंचालनातून चांगला पैसा कमवत आहे. काही गोष्टी या पैशांसाठी न करता आपल्याला मिळणाऱ्या आनंदासाठी कराव्यात असे मला वाटते. त्यामुळेच मी हा निर्णय घेतला आहे.
- prajakta.chitnis@lokmat.com