साऊथ सिनेमांचा सुपरस्टार आणि अभिनेते रजनीकांत यांचा जावई धनुषचा जन्म 28 जुलै 1983 रोजी चेन्नईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. आज तो त्याचा 35वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचं खरं नाव वेंकटेश प्रभू कस्तुरी राजा आहे. साऊथमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक कस्तुरी राजा यांचा तो मुलगा. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी धनुषने त्याच्या वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या 'थुल्लुवाधो इलामाई' या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर साऊथमधील अनेक चित्रपटांत त्याने काम केलं. त्याचबरोबर त्याने बॉलिवूडमधील 'रांझणा' आणि 'षमिताभ' यांसारख्या चित्रपटांत काम केलं आहे.
धनुषने एका इंटरव्ह्यूमध्ये बोलताना सांगितले होते की, त्याला कधीच अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा नव्हती. लहान असताना त्याच्या घरी कधी कोणी स्टार्स आले तर तो आपल्या खोलीत जावून लपून बसत असे. पण त्याचे वडील दिग्दर्शक असल्याने त्यांनी त्याच्यामध्ये असलेलं अॅक्टिंगचं टॅलेन्ट ओळखलं. मात्र त्यावेळी धनुष हॉटेल मॅनेजमेंट करून शेफ बनण्याचं स्वप्न पाहत होता.
फक्त वडिलांच्या आग्रहाखातर धनुषने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर धनुषलाच या क्षेत्राची आवड निर्माण झाली आणि त्यानंतर त्याने एकापेक्षा एक असे सुपरहिट चित्रपटांची मेजवानी चाहत्यांना दिली.
धनुष एका साधारण कुटुंबातून आला आहे. त्याच्या अभिनयातूनही हा साधेपणा दिसून येतो. चित्रपटांत काम करण्यास सुरुवात केल्यानंतर त्याचा साधा लूक आणि साधी राहणी यावरून अनेकांनी त्याला खूप गोष्टी ऐकवल्या होत्या. तरीही त्याने आपला साधेपणा जपला आणि आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर सुपरस्टारपर्यंतचा प्रवास पार केला.
बॉलिवुडमध्ये 'रांझणा' या चित्रपटातून त्याने दणक्यात एन्ट्री घेतली. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही हिट ठरला. यातील त्याचा बनारसमधील दक्षिण भारतीय लूक प्रेक्षकांनी अगदी डोक्यावरचं घेतला, पण त्यानंतर आलेल्या अमिताभ यांच्यासोबतच्या 'षमिताभ'ला खास पसंती मिळाली नाही, पण तरीदेखील त्या चित्रपटातील धनुषचा अभिनय भाव खाऊन गेला.
धनुषचाही त्या स्टार्समध्ये समावेश होतो ज्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी आपलं शिक्षण अर्ध्यावरचं सोडलं. यामागील कारणंही थोडं फिल्मीचं आहे. धनुष 10वी पर्यंत अभ्यासात हुशार होता. पण त्यानंतर तो प्रेमात पडला आणि त्यानंतर त्याने अभ्यास करणंच सोडून दिलं. तिथंच धनुषचं शिक्षण अर्धवट सुटलं. 2011मध्ये धनुषला पेटा कडून 'हॉटेस्ट वेजिटेरिअन सिलेब्रिटी' चा किताब देऊन गौरवण्यात आलं होतं.
अभिनयाव्यतिरिक्त धनुषला गाण्याची आणि लिखाणाची आवड आहे. त्यानं स्वतः लिहिलेलं आणि गायलेलं 'व्हाय दिस कोलावरी दी' हे गाणं जगभरातील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. त्याचवेळी धनुषसाठी बॉलिवूडचे दरवाजे उघडले. याआधी फार कमी जणांना माहीत होते की, साऊथमध्ये एक सुपस्टार आहे आणि तो रजनीकांत सारख्या सुपरस्टारचा जावई आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या 'वीआईपी 2' ची स्क्रीप्ट त्याने स्वतः लिहिली होती.
तुम्हा ऐकून आश्चर्य वाटेल धनुषने गायलेलं 'व्हाय दिस कोलावरी दी' हे गाणं फक्त 6 मिनिटांमध्ये लिहिलं गेलं असून अवघ्या 35 मिनिटांमध्ये त्याचं रफ वर्जन रेकॉर्डही करण्यात आलं होतं. हे गाणं भारतातील असं पहिलं व्हिडीओ गाणं होतं की, ज्याला यूट्यूबवर 100 मिलियन पेक्षा जास्त हिट्स मिळाले होते.
साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिच्यासोबत धनुष नोव्हेंबर 2004 मध्ये लग्न बंधनात अडकला. दोघांची पहिली भेट धनुष स्टारर 'काधाल कोन्दें' या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगवेळी झाली होती. या सिनेमातील धनुषचा अभिनय पाहून ऐश्वर्या खूप इम्प्रेस झाली होती. त्यानंतर तिने त्याला फुलांचा बुके पाठवला आणि हळूहळू दोघांमध्ये मैत्री वाढली. वर्षभरानंतर दोघं लग्नगाठीत अडकली. विशेष म्हणजे ऐश्वर्या धनुषपेक्षा वयाने दोन वर्षे मोठी आहे. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी धनुषने ऐश्वर्यासोबत लग्न केलं.
धनुषला आत्तापर्यंत 39 वेळा अवॉर्ड्ससाठी नामांकन मिळाले आहे आणि त्याने त्यापैकी 27 अवॉर्ड्स आपल्या नावी केले आहेत. 2014 मध्ये त्याला रांझणा या सिनेमासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला होता.
धनुष शिवशंकराचा भक्त आहे. शंकराच्या नावावरच त्याने आपल्या दोन्ही मुलांची नावे ठेवली आहेत. यात्रा आणि लिंगा ही त्यांच्या मुलांची नावे आहेत.