मुंबई : बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या हास्यावर, अदांवर आजही लाखो चाहते जीव ओवाळतात. माधुरीची जादू आजही बघायला मिळते. ती आता लग्न करुन बरीच वर्ष झाली आणि तिचा सुखाचा संसार सुरु आहे. पण माधुरीसारख्या सुंदर आणि गुणी मुलीला कुणी लग्नासाठी नकार दिला असेल, असा विचार कधी कुणी केला नसेल. पण हे खरंय. माधुरीला बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध गायकाने लग्नाला नकार दिला होता.
प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी माधुरी दीक्षितला लग्नासाठी स्पष्ट नकार दिला होता, असा खुलासा झाला आहे. पण या नकारामुळेच माधुरी इतकी यशस्वी अभिनेत्री होऊ शकली, असेही म्हणावे लागेल. त्याचं झालं असं की, माधुरीचं कुटुंब हे पारंपारिक विचाराचं. माधुरीच्या वडीलांना तिने सिनेमात काम करणं पसंत नव्हतं.
माधुरीने लग्न करून संसार थाटावा असा त्यांचा तगादा होता. म्हणून खूप आधीपासून तिचे वडील तिच्यासाठी स्थळं शोधत होते. आणि असेच ते एक दिवस सुरेश वाडकरांकडे माधुरीचं स्थळ घेऊन गेले होते. मात्र एका मजेशीर कारणाने सुरेश वाडकर यांनी माधुरीसोबत लग्न करण्यास नकार दिला होता.
ज्यावेळी माधुरीचे वडील सुरेश वाडकरांकडे गेले होते त्यावेळी वाडकरांनी गायनात स्वतःचं करिअर बनवण्यास सुरुवात केली होती. माधुरीचे वडील सुरेश वाडकरांकडे मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन गेले. त्यावेळी वाडकर माधुरीहून 12 वर्षांनी मोठे होते. त्यामुळे वाडकरांनी माधुरीशी लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. त्यासोबतच मुलगी खूपच बारीक असल्याचं कारण त्यावेळी वाडकरांनी दिलं होतं.
पुढे 1984 मध्ये माधुरीनं 'अबोध' चित्रपटातून पदार्पण केलं आणि तिनं मागं वळून पाहिलंच नाही. पुढे 1999 मध्ये माधुरीनं डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न करून संसार थाटला. पण त्यावेळी मिळालेल्या एका नकारानं माधुरीचं ग्लॅमरस करियर घडलं आणि ती स्टार बनली. पुढे अनेकदा माधुरीच्या सिनेमांसाठी वाडकरांनी पार्श्वगायनही केलंय.