Join us

खुमासदार विनोदाची धमाल मस्ती..!

By admin | Published: October 25, 2016 3:15 AM

विनोदी बाज असलेल्या नाट्याला सावळागोंधळाची फोडणी दिली की जे काही निर्माण होते ते खुमासदार असते. फक्त त्या नाट्याच्या प्रत्येक अंगाने त्यासाठी किती घाम गाळला आहे

- राज चिंचणकरविनोदी बाज असलेल्या नाट्याला सावळागोंधळाची फोडणी दिली की जे काही निर्माण होते ते खुमासदार असते. फक्त त्या नाट्याच्या प्रत्येक अंगाने त्यासाठी किती घाम गाळला आहे, यावर ते अवलंबून असते. यातली एक बाजू जरी कमी पडली, तर नाटकाचा फियास्को व्हायला वेळ लागत नाही. मात्र हे सगळे अंगी बाणवून आनंदा नांदोस्कर आणि त्यांच्या चमूने ‘नात्यातून गोत्यात’ हे नाटक सादर केल्याचे स्पष्ट होते. साहजिकच एक खेळकर, विनोदी आणि रहस्याची खुमारी असलेले हे नाटक धमाल वठले आहे.मंदार हा बावळट आणि नेभळट असल्याची त्याच्या बायकोची, म्हणजे मंजिरीची खात्री आहे. तिच्या या म्हणण्याला छेद देण्यासाठी मंदार, त्याचा मित्र नंदा याच्या मदतीने एक धाडसी निर्णय घेतो. मंजिरी माहेरी गेल्यावर नंदा एका मैत्रिणीची सोय मंदारच्या घरात करतो. त्याप्रमाणे अत्यंत आधुनिक पेहरावातल्या रोमाची एंट्री त्याच्या घरात होते. त्याचवेळी योगायोगाने मंदारचे सासरेबुवा, श्रीरंगराव हेसुद्धा अचानक या घरात टपकतात. साहजिकच, मंदारची तारांबळ उडते. मात्र रोमाला पाहून श्रीरंगरावांचा हिरवटपणा जागृत होतो आणि नाट्याला वेगळेच वळण मिळते. या जोडीला, एका सूटकेसची अदलाबदल नाट्यात रहस्य निर्माण करते आणि नाट्यातला हा सावळागोंधळ अधिकच वाढत जातो.श्रीनिवास भणगे यांचे खुसखुशीत लेखन आणि आनंदा नांदोस्कर यांचे चपखल दिग्दर्शन यांचे सूर जुळून आल्याने हे नाट्य चांगले फुलले आहे. धमाल, मस्ती हा या नाटकाचा बाज प्रकर्षाने अधोरेखित करण्याचे काम त्यांनी केले आहे. चुरचुरीत संवाद आणि प्रसंगांची योग्य पेरणी करत लेखकाने हे नाट्य विणले आहे. नाटक कुठेही कंटाळवाणे होणार नाही, याकडे लक्ष पुरवत त्यांनी संहितेला वेग दिला आहे. नाटकाची जातकुळी ओळखून दिग्दर्शकाने रंगमंचाच्या अवकाशाचे योग्य भान राखत यातली पात्रे उभी केली आहेत. काही प्रसंग थोडे लांबल्यासारखे वाटतात, मात्र हे लांबण नाटकाच्या एकूणच वृत्तीत खपून जाते.कलावंत मंडळींनीही यात यथायोग्य कामगिरी पार पाडली आहे. वर्षा कांबळी हिने टेचात रोमा रंगवली आहे. हे पात्र रंगवणे ही खरेतर तारेवरची कसरत होती; परंतु तिने हे व्यवधान अचूक सांभाळले आहे. आनंदा नांदोस्कर यांनी श्रीरंगराव साकारताना रंगेल म्हाताऱ्याचे सगळे गुण आणि अवगुण धमाल पद्धतीने आविष्कृत केले आहेत. बावळट ध्यान असलेले मंदारचे पात्र राकेश राऊत याने छान उभे केले आहे. यांच्यासह संदीप तटकरे (नंदा), प्रियांका कासले (मंजिरी), संजय पाटील (जॉन व डॉक्टर), ज्योती लोटलीकर (म्हात्रे मॅडम) यांची सुयोग्य साथ नाटकाला लाभली आहे. उल्हास सुर्वे यांनी नेपथ्यात वेगळेपणा आणण्याचा केला प्रयत्न ठळकपणे दिसतो. पुंडलिक सानप यांची प्रकाशयोजना, अरुण कानविंदे यांचे संगीत आणि दादा परसनाईक यांचे ध्वनी संयोजन नाट्याला पूरक आहे. एकूणच, श्रीभवानी प्रॉडक्शनचे हे नाटक मनोरंजनाचा तडका देत दोन घटका हास्यात बुडवून टाकणारे आहे.